
माळेवाडीतील घटना नगदी 74 हजारांसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास
केज (रिपोर्टर): केज तालुक्यातील माळेगावात 25 ते 30 वर्षे वयोगटातील चार ते पाच अनोळखी तरुणांनी तोंडाला रुमाल बांधत एका घरात घुसून चाकुचा धाक दाखवत दहशत माजवत घरामधील 74 हजार रुपयांच्या नगदी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची घटना काल दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेने माळेगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे हे करीत आहेत.
याबाबत अधिक असे की, केज तालुक्यातील मालेगाव येथील अण्णा कोंडीराम वाळक हे शेतकरी आपल्या घरामध्ये पत्नीसह होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील चार अनोळखी तरुण तोंडाला रुमाल बांधून घरामध्ये घुसले. हातातल्या धारदार चाकुने अण्णा वाळक यांना धमकावत कपाय उघडण्यास लावले. कपाटामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रक्कम चोरट्यांनी हस्तगत केली. या वेळी त्यांनी वाळक यांच्या पत्नीलाही चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले.
चोरट्यांनी एक तोळ्याचे सोन्याचे झुंबर, सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 7 ग्रॅम वजनाचे गंठण, 5 ग्रॅमची सोन्याची ठुसी, 4 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, 4 ग्रॅमची अंगठी, 74 हजार रुपये नगदी असे चोरून नेले. भरदुपारी माळेगावात चोरट्यांनी घर लुटल्याने या भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साडेचार लाखांपेक्षा जास्त रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी अण्णा कोंडीराम वाळक यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात युसुपवडगाव पोलीस ठाण्यात गु. र.नं. 137/2025 कलम 309 (6) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.