
अंबाजोगाईसह नांदेडला पथक रवाना, सोन्याच्या पावत्या पोलिसांकडे जमा
संभाजीनगर/बीड (रिपोर्टर):
संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोडा प्रकरणात एक मोठी माहिती समोर येत असून लड्डा यांच्या घरातून चोरीला गेलेल्या दागिन्यांची विल्हेवाट बीड जिल्ह्यात आणि नांदेड जिल्ह्यात झाल्याचे सांगण्यात येत असून लड्डा कुटुंबियानी चोरीला गेलेल्या दागिन्यांच्या पावत्या पडताळणीसाठी पोलिसांच्या सुपूर्द केल्या आहेत. दरोडेखोरांनी चोरलेले सोने नेमके विकले कुठे? किंवा ठेवले कुठे? याचा तपास लावल्याचा दावा पोलिसांकडून होत आहे. आज एक पथक अंबाजोगाईत डेरेदाखल झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या सोबत एक दरोडेखोर असून तो सोन्याचा शोध घेण्याबाबत पोलिसांना मदत करणार असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एन्काउंटरमध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकर याने नांदेड येथील एका व्यक्तीला चोरीचे सोने दिल्याचे तपासात समोर आले आहे. या माहितीच्या आधारे, चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके नांदेड आणि बीडच्या अंबाजोगाई येथे रवाना झाली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या अंबाजोगाई येथील एका दरोडेखोरालाही या पथकांसोबत नेले आहे, जेणेकरून सोन्याचा शोध घेण्यास मदत होईल.
बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात पडलेल्या दरोड्यात तब्बल साडेपाच किलो सोने, 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपये रोख असा मोठा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला होता. यापैकी आतापर्यंत पोलिसांना केवळ 32 तोळे सोने आणि 8 लाख रुपये हस्तगत करण्यात यश आले आहे. उर्वरित सोन्याच्या शोधासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
दरोडा पडल्यानंतर तब्बल 19 दिवसांनी, मंगळवारी उद्योजक लड्डा यांनी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पवार यांची भेट घेतली आणि त्यांना चोरीला गेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या पावत्या सादर केल्या. गेली काही दिवस संतोष लड्डा हे चोरीला गेलेल्या सोन्याच्या पावत्या का देत नाहीत, यावर शहरात चर्चा सुरू झाली होती. आता पावत्या सादर केल्याने पोलिसांना तपासात अधिक मदत होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.