
रिपोर्टरने केला होता भ्रष्टाचाराचा पर्दाफाश

परळी (रिपोर्टर): खासगी ग्राहकांच्या विजेची लाखो रुपयांची थकबाकी परळी नगर परिषदेच्या नावे टाकल्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम सायं. दैनिक बीड रिपोर्टरने प्रकाशीत केल्यानंतर वीज बील घोटाळा समोर आल्याने वीज खात्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी अखेर वीज कंपनीने चौकशीअंती परळी उपविभाग अंबाजोगाई विभागाचे सहाय्यक अभियंता रत्नदीप समिंदर कटके यांना सेवेतून निलंबीत केले आहे. या प्रकरणी आणखी काही लोकांवर कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, वीज कंपनीच्या एनसी पोर्टलमध्ये छेडछाड करत खासगी ग्राहकांचे लाखो रुपयांचे बील परळी नगरपालिका अंतर्गत येणार्या वेगवेगळ्या ऑफीसच्या नावे टाकण्यात आले होते. याबाबतचे वृत्त गेल्या 6 जून रोजी सायं.दैनिक बीड रिपोर्टरने प्रकाशीत केले होते. या वृत्ताने वीज कंपनीत एकच खळबळ उडाली होती. जेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा सहाय्यक अभियंता रत्नदीप कटके यांच्या एनसी पोर्टलच्या लॉगीन आयडीमधून छेडछाड करत खासगी ग्राहकांचे लाखो रुपयांचे बील हे परळी नगरपालिकेच्या विविध कार्यालयांवर लादण्यात आले होते. अखेर सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रत्नदीप कटके यांना निलंबीत करण्यात आले. त्याचबरोबर आठवड्यातील दोन दिवस शहर विभाग कार्यालय पनवेल येथे हजेरी नोंदविण्याबाबत सांगण्यात आले आहे. या अपहार प्रकरणी अन्य दोषींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी आणखी काही जणांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.











