
राज ठाकरेंचा 6 जुलैला मोर्चा
मुंबई : राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचा दावा करत राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाला मनसेनं थेट विरोध केला. त्यानंतर, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी आम्हाला शासनाची भूमिका अजिबात मान्य नाही. सरकारने पटवून देण्याचा विषयच येत नाही, आम्हाला भूमिका मान्य नाही असे राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे. तर, 6 जुलै रोजी मराठी माणसांचा हा मोर्चा गिरगावहून निघेल, अशी घोषणाही राज ठाकरेंनी केली.
भाजपाकडून भाषिक आणीबाणी लादली जाते आहे-उद्धव ठाकरे
आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला आहे. हिंदीला विरोध नाही कारण हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईतच जन्माला आली. अमिताभ बच्चन असतील, हिंदी कलाकार असतील, गायक असतील हे मुंबईत आले आणि मोठे झाले. हिंदी सिने तारे-तारका इथे येऊन मोठी होतात. एकाधिकारशाहीकडे भाजपाची वाटचाल सुरु आहे. आणीबाणी लादल्याचा विषय भाजपाने आणला होता. त्यांनी बुधवारच्या दिवशी विरोध दर्शवला पण मी हे सांगतो आहे की भाषिक आणीबाणी आहे. भाषिक आणीबाणी भाजपाकडून लादली जाते आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन झालं आहे. आपल्या देशाची रचना भाषावर प्रांतरचना झाली आहे. प्रांत मिळाल्यानंतर राजधानी, मुख्यमंत्री मिळाले. मी मुख्यमंत्री असताना मला मराठी भाषेची सक्ती करावी लागली होती. ती सक्ती मी केली होती त्याबद्दल या सरकारने काय केलं? हे माझ्या वाचनात आलेलं नाही. मराठी रंगभूमीचं दालन करायचं ठरवलं होतं, आराखडा मंजूर झाला होता पण महाराष्ट्र द्रोही सरकारने ते हाणून पाडलं. बिल्डर्सच्या घशात ती जमीन घातली आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवनाचंही भूमिपूजन झालं होतं तिथे एकही वीट रचली गेलेली नाही. अजित पवार तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. हे जे काही चाललं आहे ते त्यांना मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.












