
जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केली
अंबाजोगाई (रिपोर्टर): जनसुरक्षा कायदा हा भाजप सुरक्षा कायदा असल्याचा आरोप करत सर्व विरोधी पक्षांनी आज रस्त्यावर उतरत या कायद्याविरोधात निदर्शने केली. जनसुरक्षा कायदा काळा कायदा असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या वेळी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांनी पत्ते भिरकावत कृषीमंत्री माणिक कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
राज्यातलं देवेंद्र फडणविसांचं सरकार हे सर्वसामान्यांसह शेतकरीविरोधातलं सरकार आहे. जनसुरक्षा कायदा हा लोकांची सुरक्षा करण्यासाठी नव्हे तर भाजप पक्षाची सुरक्षा करण्यासाठी केलेला कायदा आहे. असा आरोप करत विरोधक आज अंबाजोगाईच्या रस्त्यावर उतरले. शहरातील शिवाजी महाराज चौकात विरोधकांनी आक्रमक होत हा काळा कायदा रद्द करा, म्हणत घोषणाबाजी केली. एकीकडे कायदा केला जात होता तर दुसरीकडे सरकारचा आमदार विधानसभेच्या कॅन्टीनमध्ये सर्वामान्य व्यक्तीला टॉवेलवर येत मारहाण करत होता. विधीमंडळाच्या बिल्डींगमध्ये भाजपा आमदाराचा कार्यकर्ता दुसर्या कायर्कर्त्याला मारहाण करत होता. सत्ताधार्यांना सवाल विचारल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते गुद्यावर येत असल्याचे चित्र लातूरमध्ये पहायला मिळाले.
ही सर्व सत्तेची मस्ती असल्याचे सांगत विरोधकांनी कृषीमंत्री माणिक कोकाटे हे सभागृहात रम्मी खेळतात म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी पत्ते उधळले. हे आंदोलन आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाले. या वेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतिब, अॅड. इस्माईल गवळी, अभिजीत लोमटे, संजीवनी देशमुख, अॅड. माधव जाधव, अॅड. प्रशांत शिंदे, मदन परदेशी, बन्सीअण्णा जोगदंड, सोमनाथ धोतरे आदी उपस्थित होते.











