
जावयाला अटक; 2 महिला व 5 पुरुषही ताब्यात
पुणे (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीतून ही अटक करण्यता आली आहे. प्रांजल हे शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. प्रांजल खेवलकर यांना पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये आज मध्यरात्री च्या सुमारास प्रांजल खेवलकर हे त्यांच्या मित्रा सोबत पार्टी करीत होते.याबाबत माहिती मिळाली असता,आमच्या टीमने छापा टाकला. त्यावेळी त्या कारवाईमध्ये दारु,गांजा आणि हुक्का हा साठा आढळून आला आहे.तर या कारवाईमध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात जावयावर कारवाई झाल्याने आता एकनाथ खडसेंवर टीका केली जाते आहे.
रोहिणी खडसेंनी सध्या बोलण्यास दिला नकार
एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे पार्टी सुरु होती. प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यामुळे सध्या बोलायला नकार दिला आहे.
तर मी ते सहन करणार नाही – खडसे
एकनाथ खडसे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काहीतरी घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पुण्यामध्ये जी घटना घडली आहे, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. माझे त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणे झालेले नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन कधीही करणार नाही.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केले जाणार नाही.
आमच्यावर अशाप्रकारची काहीतरी कारवाई केली जाईल किंवा ट्रॅप रचला जाईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिल्यानंतर गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, जर ट्रॅप लावला जाणार आहे, याची कल्पना खडसेंना होती तर त्यांनी जावईबापूंना अलर्ट करायला हवे होते. गिरीश महाजन पुढे म्हणाले, मला वाटते खडसेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. जे झाले ते मान्य केले पाहिजे. तपासानंतर ज्यांची चूक आहे, त्यांना शिक्षा होईल. काही झाले की, म्हणायचे यात षडयंत्र होते. त्यांनी असे केले, यांनी हे केले. मला वाटते, प्रत्येकवेळी आपल्याबरोबरच षडयंत्र कसे काय होते?









