माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी बंद पडलेल्या मल्टीस्टेट, पतसंस्था व नागरी बँकांमधील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे बैठकीची मागणी पत्राद्वारे केली होती याची दखल घेत गृह विभागाच्या वतीने येत्या 6 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप सोसायटी, साईराम मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी सोसायटी, मराठवाडा अर्बन, मुक्ताई अर्बन, हिंदवी स्वराज्य सहकारी पतसंस्था, सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्था, धुनकेश्वर अर्बन, जल कल्याण सहकारी पतसंस्था, मातोश्री महिला नागरी पतसंस्था या पतसंस्था मल्टीस्टेट नागरी बँकांमध्ये गैरव्यवहार होऊन बंद पडलेल्या आहेत. यामध्ये लाखो लोकांच्या हजारो करोडांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. याबाबत आमदार प्रकाश सोळंके यांनी अधिवेशनात देखील लक्षवेधी मांडत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील 17 जुलै रोजी बैठक बाबत मागणी केली होती याची दखल घेत राज्य शासनाच्या गृह विभागाने सहा ऑगस्ट 2025 रोजी ग्रह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. दरम्यान या बैठकीमुळे निश्चितच ठेवीदारांना दिलासा मिळाला असून या प्रश्नी आमदार प्रकाश यांनी मांडलेली लक्षवेधीची व पत्राची दखल शासनाने घेतली आहे.








