
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर बॅरेकेटींग, खासदारांकडून बॅरिगेट तोडण्याचा प्रयत्न
दिल्लीत तुफान राडा, राहूल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत सह अनेक खासदार अटक
300 खासदारांचा संसदेबाहेर ठिय्या

राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा, ‘मतांची चोरी बंद करा’च्या घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसेवा): लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लोकसभा ते निवडणूक आयोग असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचा समावेश आहे. मत चोरीच्या आरोपांवर उत्तर द्या अशा मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान अखिलेश यादव यांनी विचारलं आहे की आम्हाला पोलीस का रोखत आहेत आम्ही शांततेत मोर्चा काढला आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातले 300 खासदार या मोर्चात सहभागी झाले आहेत.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशभरातील मतदान प्रक्रिया, वाढीव मतदान आणि मतांची चोरी या विरोधात सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे. निवडणूक आयोग कशापद्धतीने सरकारची कठपुतली झाले आहे यावरही राहूल गांधी आक्रमकपणे बोलत आहेत. आज तब्बल 300 खासदारांच्या उपस्थितीत मतचोरीच्या मुद्यावरून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ज्या वेळी मोर्चा काढण्यात आला त्यावेळी मोर्चा रोखण्यासाठी जागोजागी बॅरेकेटींग लावण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी जवान तैनात केलेले पहायला मिळाले. या वेळी बॅरेकेटींग तोडण्याचा प्रयत्न खासदारांकडून झाला. राहूल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात आहेत. सर्व खासदारांनी आता संसदेसमोर ठिय्या मांडल्याचे दिसून येते. हे सर्व खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यावर ठाम असल्याचे दिसून आले. प्रथमच 300 खासदार एकाच वेळी सरकारविरोधात उतरल्याचे दिसून येते.








