
जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण
परळी (रिपोर्टर): परळी तालुक्यातील कासारवाडी येथील ’बोरणा’ मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच 100 पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.
परळी तालुक्यात चांगला पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील ’वाण प्रकल्प’ पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्रकल्पाची प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता 10. 814 द. ल. घ. मी. एवढी आहे. मृतसाठा 1.842 द. ल. घ. मी. इतका असून सद्यस्थितीत बोरणा प्रकल्पात सांडव्यावरुन पाणी प्रवाहित झाले आहे. तालुक्यातील नागापुर वाण, बोधेगाव, करेवाडी , कन्हेरवाडी, मालेवाडी, तांदुळवाडी , मोहा ,चांदापुर ,गुट्टेवाडी,खोडवा सावरगाव, दैठणाघाट आदींसह पाझर तलाव, साठवण तलाव, शेततळे, लघु व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, विहिरी पूर्ण क्षमतेने भरली जात आहेत. जलसाठे संपूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत असल्याने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे.









