
शेतकरी फुलसांगवीत मंदिरासमोर करणार उपोषण
बीड, (रिपोर्टर)ः- फुलसांगवीच्या तलावामध्ये पाण्याचा साठा अत्यंत कमी असतो. उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही. तलावात पाणी असल्यास शेती पिकांना त्याचा फायदा होतो. सिंदफणाच्या नदीतील पाणी तलावामध्ये सोडण्यात यावे अशी मागणी येथील शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र याची दखल घेतली जात नाही. 15 सप्टेंबरपासून शेतकरी पुन्हा गावातील संत वामनभाऊ मंदिराजवळ आमरण उपोषणाला बसणार आहेत असा इशारा गावकर्यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून तलावात पाणी सोडण्याची मागणी आहे. गतवर्षी प्रशासनाने फक्त आश्वासन दिले होते. याची अद्यापही पुर्तता करण्यात आलेली नाही. यावर्षी तरी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 15 सप्टेंबर 2025 पासून फुलसांगवी ता.शिरूर कासार येथील संत वामनभाऊ मंदिराच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिलेला आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले. या उपोषणामध्ये भास्कर सानप, अनंता तळेकर, निलेश खेडकर, सुमीत वनवे, विश्वजीत नागरगोजे, वळकर, गोवर्धन डोळे यांच्यासह आदीं शेतकरी 15 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.








