
हेक्टरी 50 हजार रुपये द्या -आ. जयंत पाटील
बीड (रिपोर्टर): मराठवाड्यातील बीड, धाराशीव, नांदेड, परभणी व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या पावसाने उद्ध्वस्त झाला आहे. पिकांसह शेती वाहून गेली, घरांची पडझड झाली, काहींचे जनावरेही मृत्युमुखी पडले आहेत. काही शेतकर्यांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, प्रसंगी या मदतीसाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडात जमा झालेल्या निधीची मदत घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. ते आज शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलत होते.
जयंत पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीची आणि घरांची पडझड झाल्याची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, माजी आमदार उषाताई दराडे, महेबूब शेख, सुशिला मोराळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, राज्य सरकार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, की पैशाचे सोंग करता येत नाही, मात्र ते सरकारमध्ये सहभागी असून भाजप हा राज्य आणि केंद्रामध्ये सत्ताधारी पक्ष आहे. कोरोना काळामध्ये एका ट्रस्टची उभारणी करून पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली. या फंडामध्ये देशातील अनेक लोकांकडून आणि विविध मोठमोठ्या कंपन्यांकडून कोट्यवधीचा निधी जमा करून ठेवण्यात आलेला आहे.
तो निधी कुठे गेला? त्या काळामध्ये या निधीत पैसे जमा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर लोकांनी मोठी वकिली केली होती. त्यांनीच आता केंद्राकडे मदत मागत पीएम केअर फंडातील निधी शेतकर्यांच्या मदतीसाठी केंद्राकडून घेण्यात यावा. शेतकर्यांना तातडीने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, त्यातील 25 हजार रुपये येत्या चार दिवसात शेतकर्यांना देण्यात यावेत, ज्यांची जनावरे पुरामध्ये वाहून गेली त्यांना किमान 50 ते 60 हजार रुपये अर्थसहाय्य करावे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निकषाच्या तिनपट निधी शेतकर्यांना देण्यात यावा, असेही शेवटी जयंत पाटील म्हणाले.








