मुंबई : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडुंब भरले आहेत तर शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच पुढील सहा दिवस, म्हणजेच दसऱ्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे पावसाची शक्यता
मध्य व वायव्य बंगाल उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा शनिवारी (२७ सप्टेंबर) सकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे. हा पट्टा चंद्रपूर–हिंगोली–पैठण–अहिल्यानगरमार्गे मुंबईकडे सरकणार असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात २७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचे सत्र सुरू राहील, असे खुळे यांनी स्पष्ट केले.
कोणत्या जिल्ह्यांत अतिजोरदार पाऊस?
🔸 २७ सप्टेंबर : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर (घाटमाथा), धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता.
🔸 २८ सप्टेंबर : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा व कोल्हापूर (घाटमाथा) येथे जोरदार पाऊस अपेक्षित.
🔸 २९ व ३० सप्टेंबर : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर (घाटमाथा) येथे अतिवृष्टीची शक्यता कायम.
धरणांतून विसर्गाचा इशारा
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे धरणांतून विसर्ग वाढण्याची व काही नद्यांना पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
उघडीपीची शक्यता
३ ऑक्टोबरपासून हवामानात काहीशी उघडीपी दिसण्याची शक्यता आहे. मात्र पूर्णतः हवामान स्थिर होण्यास अजून वेळ लागेल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने उद्या (२७ सप्टेंबर) सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
👉 राज्यातील नागरिकांनी या पावसाळी परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाने केले आहे.









