
पाऊस गेला, पाणी ओसरले, पिकांचे उद्ध्वस्त धुमारे दिसले
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): 13 सप्टेंबरपासून बीड जिल्ह्यात धुवॉधार पावसाला सुरुवात झाली ते 27 सप्टेंबरपर्यंत. चार ते पाच वेळा जिल्ह्यातल्या सर्वच भागात अतिवृष्टी झाली. तब्बल 15 दिवस शेतामधलं पाणी नितळलं नाही. आजही काही भाग पुराच्या पाण्यात आहेत. त्यामुळे 8 लाखांपेक्षा जास्त खरीपाचा पेरा झालेल्या शेतातील सोयाबीन, कापूस, ऊस, तूर, मूग यासह अन्य पिके पुर्णत: उद्ध्वस्त झाले. फळबागा नेस्तनाबूत झाल्या. भाजीपाल्याचे होत्याचे नव्हते झाले. आता जेव्हा पाणी ओरसतय तेव्हा पिकांचे उद्ध्वस्त धुमारे बाजरी, सोयाबीनचे कोंब, लाल पडत चाललेला कापूस, झोपलेला ऊस, बुडासकट उखडून गेलेली मोसंबी पाहून शेतकर्यांच्या डोळ्यात दु:खांकित अश्रू वाहत आहेत. त्या ओल्या जखमा हृदयाला खंदून काढत आहेत आणि सरकार मायबापाकडे मदतीची याचना करत आहेत. अद्याप पुर्णत: पंचनामे झाल्याचे सांगण्यात येत नाही. प्रत्यक्षात शेतकर्याला अद्यापही कुठलीही मदत मिळाली नाही. ती मदत ताकाळ मिळावी आणि बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीक रावा, अशी मागणी होत आहे.

बीड जिल्ह्यात शासकीय आकडेवारीनुसार 7 लाखापेक्षा अधिक हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे सांगितले जाते. मात्र इथे पूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे. फळबागा कोलमडून गेल्या आहेत. भाजीपाला जमीनदोस्त झाला आहे त्यामुळे शेतकर्यांकडे आता काहीच उरला नाही. शासन-प्रशासन व्यवस्था पंचनाम्याचे खटाटोप करत आहे. पंचनामे झाले नाहीत म्हणून लोकांपर्यंत मदत पोहचली जात नसल्याचेही बोलले जात आहे. अशा गंभीर परिस्थितीत आणि पंधरा दिवस पावसाच्या मार्यात झोडपून निघालेल्या शेतकर्याला तातडीची मदतीची गरज आहे. अनेक शेतकर्यांची शेती औजारे, जनावरे आणि काढून ठेवलेले बाजरीचे बुड, जनावरांसाठी असलेले वैरणही वाहून गेले आहे. त्यामुळे जनावरांनाही खायला घालण्यासाठी शेतकर्यांकडे काही नाही. अशा वेळी शासनाने बीड जिल्ह्यातल्या शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. शेतकर्यांचा पंचनामा करण्यापेक्षा वेळ दवडण्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करा आणि दुष्काळातल्या सर्व सुविधा बीड जिल्ह्यातल्या शेतकर्यांना द्या, अशी मागणी सर्व पक्ष, संघटना, आमदार, खासदार यांनी केल्याचे दिसून येते. मग राज्य सरकार मदतीसाठी नेमकी कोणाची वाट पाहतो? हा सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे मेटाकुटीला आलेला शेतकरी राज्य सरकारकडे याचना करत आहे, आम्हाला कुठल्याही स्थितीत तात्काळ मदत द्या, अशी मागणी करत ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीवर ते शेतकरी ठाम आहेत.

गोदेचं पाणी ओसरलं, लोक पुन्हा घराकडे
या दशकभरातला सर्वात मोठा महापूर गोदावरी नदीला गेली दोन दिवस आला. पैठणच्या नाथसागरातून 3 लाखापेक्षा जास्त पाणी गोदावरी पात्रात सोडल्याने बीड जिल्ह्यातले 60 आणि जालना जिल्ह्यातील 50 गावांमध्ये पाणी शिरले. त्या गावांना दोन दिवसांपासून स्थलांतरीत करण्यात आले होते. आज सकाळपासून पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरत असल्याने स्थलांतरीत झालेले नागरीक आता आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. पुराच्या पाण्याने काय संकट उभा केलं हे जो तो पाहत आहे. काही गावांमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या लोकांनाही अद्यपा शासनाकडून कुठलीही मदत दिली गेलेली नाही.
सिंदफणा काठची शेती उद्ध्वस्त
या पंधरा दिवसांच्या कालखंडात सिंदफणेला तीन ते चार वेळा पूर आला, या पुराच्या पाण्याने अक्षरश: पात्र सोडले आणि नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे अनेक शेतकर्यांचे शेत खंदून गेले आहे. त्या शेतकर्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. खरडून माती गेल्याने त्या शेतकर्यांना आपली जमीन सुपीक करण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षे लागणार आहेत. त्या शेतकर्यांच्या नुकसानीबाबतही शासन -प्रशासन व्यवस्थेकडून काहीच मांडण्यात आले नाही.








