
विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लडने की…
आजच्या कलियुगात जातीपातीचा राक्षस जन्माला आलाय, त्याचा नाश करा
सावरगाव घाट (भगवान भक्तीगड) (रिपोर्टर): आपला मेळावा साध्या, फाटक्या अन् कष्टकरी माणसांचा आहे, त्यांच्यासाठी यापुढेही कायम संघर्ष करण्याचा निर्धार राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज दसरा मेळाव्यातून बोलतांना केला. आपण नवरात्रात नऊ दिवस देवीची पूजा केली. त्या देवीने महिषासूर व रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला. आजच्या कलयुगातही असे राक्षस जन्माला आलेत. त्यामुळे आपणही या जातीपातीच्या राक्षसांचा नाश केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आपलं सरकार या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात खंबीरपणाने पाठीशी राहिले आहे आणि यापुढेही राहणार आहे. त्यामुळे पूरग्रस्तांनी व शेतकर्यांनी चिंता करण्याची गरज नाही. आपल्या प्रत्येक नुकसानाची भरपाई निश्चित होणार आहे. सध्या रक्तबिजा सारखी जातीवादी- धर्मवादी राक्षसी वृत्ती निर्माण झाली असून सामाजिक संतुलन बिघडवण्याचे काम ही वृत्ती करीत आहे. दसर्याच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, सौहार्द व संतुलनाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी असे आवाहनही त्यांनी केले.

सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवान भक्ती गडावर पारंपारिक दसरा मेळावा नेहमीप्रमाणेच प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी जनसागराला संबोधित करताना ना. पंकजाताई बोलत होत्या. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अठरापगड जाती धर्मातील उपेक्षित, वंचित व भगवान बाबांवर निस्सीम श्रद्धा असणारे लाखो लोक मेळाव्यात उपस्थित होते. यावर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या संकटात शेतकरी असताना शेतकर्यांच्याच हिताचा विचार व परंपरा जपण्याच्या दृष्टिकोनातून हा मेळावा पार पडला.
जात पाहणं, भेदभाव करणं मी शिकलेच नाही
———————
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा मी जपत आहे. अठरा पगड जातीच्या माणसासाठी मी लढत आहे. मुंडे साहेबांनी मला जी शिकवण दिली आहे, तो वसा आणि वारसा मी कधीही सोडणार नाही.तुम्हाला खाली मान घालायला लावणार नाही. सत्तेत असो की विरोधात, सामान्य माणसाचं हित माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही.माझ्या मंचावर उपस्थित असलेल्या, निवडून आलेल्या माणसाच्या प्रचाराला गेले, त्याची कधी जात पाहिली नाही. जात पाहिली ती फक्त माणसाची. कारण जात पाहणं, भेदभाव करणं मी शिकलेच नाही.भगवान बाबांनी ते शिकवलं नाही आणि माझ्या बाबांनीही ते शिकवलं नाही असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
कोणाला विरोध नाही पण आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका
——————
गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वसा व वारसा चालवत असताना, प्रत्येक जाती-पातीच्या माणसासाठी मी नेहमीच लढत आलेले आहे. काल आमचा बोर्हाडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला, दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली. गोपीनाथ मुंडेनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, आपणही मराठा आरक्षणाला तेच समर्थन दिलेलं आहे. मराठा आरक्षणाला मुंडे साहेबांनी विरोध केला नाही, आम्ही केला नाही पण आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका येवढीच रास्त भूमिका व विनंती आमची आहे.
दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने रहा
——————–
राष्ट्रसंत भगवानबाबांनी ’एकर विका, पण शिक्षण शिका’ अशी शिकवण आपल्याला दिली आहे. आज परिस्थिती वेगळी आहे. त्याच शिकवणीप्रमाणे माझे म्हणणे आहे की, ’दोन घास कमी खा -पण स्वाभिमानाने रहा. कोणाचे तुकडे उचलू नका. कोणाचे पैसे घेऊ नका. खोटी कामं-खोटे धंदे करू नका.चांगल्या माणसाचं चांगलंच होतं. भगवान बाबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.मला तुमचा अभिमान आहे असे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.
महापुराच्या आपत्तीतही एक इष्टापत्ती: माणुसकीचा धागा कायम
—————–
आज मराठवाड्यावर नैसर्गिक संकट आले तरी दसरा मेळाव्याची परंपरा आपण जपली आहे. मराठवाड्यातील लोकांचे संसार वाहून गेले आहेत. लोकांचे दु:ख पाहून मी हेलावून गेले. मी माझ्या वेदना शब्दांत मांडू शकत नाही. नैसर्गिक आपत्तीतही एक इष्टापत्ती बघायला मिळाली. जाती-पातीचे बंध गळून पडले आहेत. महापुराच्या काळात माणुसकीचा धागा कायम असल्याचे सकारात्मक चित्र दिसले.महापुराच्या काळात जातीपातीपलिकडे जाऊन प्रत्येक जण एकमेकांसाठी धावून गेला.जातीपातीच्या पलिकडे जाऊन माणुसकीचा धागा जोडण्याचं असं काम आपण केल पाहिजे असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.








