
बंगालीपिंपळा येथे जनावरे दगावली ; पशुसंवर्धन विभागाचे मात्र दुर्लक्ष
गेवराई : (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा, तांदळा, कोळगाव आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये लंपी रोगाने जनावरांचा जीव धोक्यात आणला आहे. अतिवृष्टीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकर्यांसमोर आता लंपी आजाराची दुसरी मोठी अडचण उभी राहिली आहे. हा लंपी आजार झपाट्याने वाढत असून शेकडो जनावरांना आत्तापर्यंत या आजाराची लागण झाली आहे. या आजाराने बंगालीपिंपळा येथे काही शेतकर्यांची जनावरे दगावली असून अनेक जनावरे गंभीर आजारी पडले असून पशुपालक, शेतकर्यांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. याकडे मात्र पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मागील महिण्यात अतिवृष्टी झाली, यामुळे खरीपाची पिके होत्याची नव्हती झाली. काही ठिकाणी जमीनी खरडून गेल्या, काही ठिकाणी पिकांची माती झाली. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असतानाच आता जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडले होते, आता लंपी आजाराने त्यांच्या दुःखाला दुहेरी आकार दिला आहे. मागील काही दिवसात या लंपी आजाराने थैमान घातले असल्याचे या भागात दिसत आहे. सध्या अनेक जनावरे या आजारामुळे त्रस्त असून त्यांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. शेकडो जनावरे या आजाराची शिकार होत असताना पशुसंवर्धन विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित सरकारी हस्तक्षेप, लसीकरण आणि योग्य औषधोपचार आवश्यक आहेत. मात्र, प्रशासनाने अद्याप सावधगिरी बाळगलेली नाही, ज्यामुळे संकट अजूनच गंभीर होत आहे. बंगालीपिंपळा या ठिकाणी 9 पेक्षा अधिक जनावरे दगावली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या रोगाने जनावरे दगावण्याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी पशुसंवर्धन विभाग अजून किती जनावरे दगावण्याची वाट पाहत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.








