कडा (बीड): काम आटोपून घरी जात असताना पैठण–बारामती रोडवरील देवीनिमगाव येथील पवणे वस्तीवर कंटेनरच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. संदीप विश्वनाथ अनारसे (वय ४०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील संदीप अनारसे हे सोमवारी रात्री पावणे आठच्या दरम्यान कड्यावरून घरी जात होते. दरम्यान धामणगाववरून कड्याकडे येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरसोबत दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात संदीप गंभीर जखमी झाले.
त्यांना तात्काळ उपचारासाठी अहिल्यानगर येथे घेऊन जात असताना मार्गातच त्यांचा मृत्यू झाला. अंभोरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आदिनाथ भडके व तुषार मिसळे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
मृतदेहाची कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे.











