आष्टी (रिपोर्टर) : बेकायदेशीर शस्त्र बाळगून चारचाकी वाहनातून फिरणार्या आरोपींविरुद्ध आष्टी पोलिसांनी प्रभावी कारवाई करत दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त केले असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.19 फेब्रुवारी 2026) रात्री सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, तसेच पोलीस हवालदार प्रवीण शिरसागर, परमेश्वर तागड, गणेश जगताप, नितीन काकडे आणि बब्रुवान वाणी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. पोलीसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, ब्रम्हगाव परिसरात पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून काही इसम बेकायदेशीर पिस्तूल घेऊन फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वाहन क्रमांक एम.एच.-25-बी.एच.–9118 अडवून झडती घेतली.
झडतीदरम्यान वाहनामध्ये खालील आरोपी आढळून आले : राहुल कल्याण खोटे, रा. भुगाव, ता. पाटोदा, जि. बीड भरत उर्फ अमृत बाबासाहेब भोसले, रा. परगाव बु., ता. पाटोदा, जि. बीड दत्ता महादेव पोकळे, रा. भुगाव, ता. पाटोदा, जि. बीड सदर आरोपींकडून दोन इंग्लिश बनावटीचे गावठी पिस्तूल (कडू) जप्त करण्यात आले असून जप्त शस्त्रांची किंमत सुमारे 1 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी पोलीस शिपाई बब्रुवान अभिमान वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत. या प्रकरणातील इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.








