बीड | रिपोर्टर
बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या निर्देशानुसार अवैध धंदे व गुंडगिरीविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने आष्टी तालुक्यातील कुख्यात इसम शुभम बाळासाहेब करडुले (वय 25, रा. शिराळ) याच्यावर MPDA (महाराष्ट्र प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अॅक्ट) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
करडुले याच्या विरोधात मारहाण, अवैध वाळू वाहतूक, सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, परंतु तो गुन्हेगारी थांबवण्याऐवजी वाढवतच होता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याने त्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडून जिल्हाधिकारींकडे पाठवण्यात आला.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रस्ताव मंजूर करून २४ नोव्हेंबर २०२५ रोजी MPDA अंतर्गत करडुले याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार आष्टी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला त्याच्या राहत्या घरीून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात २५ नोव्हेंबर रोजी पहाटे आरोपीला हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे नेऊन स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शिवाजी बंटेवाड, पोनि शरद भुतेकर आणि स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांनी केली.
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, जिल्ह्यातील अवैध वाळू व्यापार, गुटखा तस्करी, काळाबाजार तसेच दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांविरुद्ध अशी कठोर कारवाई पुढेही सुरू राहील.












