माजलगाव शहरात भरदिवसा थरार, तीन अपहरणकर्ते ताब्यात
माजलगाव (रिपोर्टर): अंबाजोगाई येथून माजलगाव येथे मावशीकडे आलेली सज्ञान तरुणी आपल्या अज्ञान भाऊ आणि बहिणीसोबत शहरातल्या बसस्थानकासमोर असताना त्याठिकाणी अंबाजोगाई येथून आलेल्या तिघा जणांनी या तिनही भावंडांना उचलून एका चारचाकी गाडीत टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर माजलगाव येथील नागरिकांनी सुमारे दीड कि.मी. त्या गाडीचा पाठलाग केला. शहरामध्येच हा थरार सुरू असताना आंबेडकर चौकात लोकांनी ती गाडी अडवली व तिन भावंडांची सुटका केली. यातील तिनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुलींसह आरोपींची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
या खळबळजनक घटनेची अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई येथील 20 ते 21 वर्षांची तरुणी आपल्या भावंडांसह माजलगाव येथील मावशीकडे आलेली होती. ही तरुणी आज सकाळी आपल्या लहान बहीण व भावासोबत माजलगाव शहरातल्या बसस्थानकासमोरील रस्त्यावर भवानी बँकेसमोर उभी होती. त्यावेळी त्याठिकाणी एम.एच. 12 – डब्ल्यू. एक्स 4167 क्रमांकाची गाडी त्यांच्या जवळ येऊन थांबली. त्यातील तिघांनी सदरील तरुणीला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी सोबतच्या भावंडांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यावेळी त्या भावंडांनाही तिघांनी गाडीत टाकले आणि गाडी बसस्थानकाकडून आंबेडकर चौकाकडे पळवायला सुरुवात केली. मुलांच्या आरडाओरडने स्थानिक नागरिकांनी त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. दिवसाढवळ्या मुलीचे अपहरण होत असल्याचे उपस्थितांनी पाहिल्यानंतर तब्बल दीड कि.मी. अंतरावर आंबेडकर चौकामध्ये नागरिकांनी गाडी अडवली. मुलींची सुटका करत अपहरणकर्त्यांना चोप देत पोलिसांना सदरील घटनेची माहिती दिली तेव्हा अपहरण करणारे आरोपी हे अंबाजोगाई येथील असल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात आले. यामधील दिनेश देवकते याच्यघा विरोधात अंबाजोगाईमध्येही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला तातकाळ हातकडी घालून अटक करण्यात आले तर सय्यद मझहर आणि निळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपहरण झालेल्या मुली आणि आरोपी सध्या माजलगाव पोलीस ठाण्यात असून पोलीस याची सखोल चौकशी करत आहेत. या अपहरणाच्या घटनेमुळे माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे.
पळवून नेणार्याविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा
घरकुल मिळालेल्या व्यक्तीच्या घरी पुणे येथून बांधकाम करण्यासाठी आलेल्या 23 वर्षीय तरुणाने संबंधित व्यक्तीची 14 वर्षाची मुलगी पळवून नेली. या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर अखेर माजलगाव पोलिसांनी सदरील मुलीचा शोध घेत आळंदी येथून मुलीसह संबंधित आरोपी ओंकार संतोष दहीवाळ याला ताब्यात घेतले. आज माजलगाव येथे आणण्यात आले असून दहीवाळ याच्या विरोधात पोस्कोसह बलातकाराचा गुन्हा दाखल केला आहे.









