शिरूर कासार (रिपोर्टर): जुन्या शिरूर कासार पोलिस ठाण्याच्या आवारात जप्त करून ठेवलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना 1 डिसेंबर रोजी घडली. आरोपी दीपक आनंदा तळेकर (वय 37, रा. फुलसांगवी) हा दुपारी 2 वाजता जप्त ट्रॅक्टर घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सिद्धेश्वर चौकात त्याला ताब्यात घेतले. चौघांच्या मदतीने ट्रॅक्टर चोरल्याची त्याने कबुली दिली.
या प्रकरणी सहायक फौजदार राम यादव यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दीपक तळेकर याला 13 मार्च 2025 रोजी चकलांबा पोलिसांच्या प्रस्तावानुसार एक वर्षासाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीही तो जिल्ह्यात उपस्थित राहून थेट पोलिस ठाण्यातील जप्त मालच चोरी करत असल्याने पोलिसांच्या वचकावर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाबाबत बाजू जाणून घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याच ठाण्यात याआधी एका पीडितेच्या आईला मदत न केल्याचा प्रकार समोर आला होता. सलग दोन घटनांमुळे शिरूर कासार पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.












