संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर सोमवारी दुपारी सुमारे 3 वाजता बनगाव लाहुकी फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली. गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि काही क्षणांतच कारला आग लागून ती जळून खाक झाली. सुदैवाने कारमध्ये असलेले सर्व पाच प्रवासी वेळेवर बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
नागपूरहून पुण्याकडे निघालेली कार करमाडकडे जात असताना हा अपघात झाला. चालकाला गतिरोधक दिसला नाही, परिणामी कार उडाली आणि दुभाजकावर आदळताच कारने पेट घेतला. प्रसंगावधान राखत अनिकेत दत्तात्रय झिरपे, दत्तात्रय गणपत झिरपे, केतकी दत्तात्रय झिरपे, कोमल अशोक गायकवाड आणि कल्पना अशोक गायकवाड यांनी वेगाने कारमधून बाहेर पडून जीव वाचवला. या सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
या घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीतून समोर आला असून, या परिसरातील हा तिसरा अपघात असल्याची माहिती स्थानिक प्रवाशांनी दिली. लाहुकी फाट्यावरील गतिरोधक धोकादायक ठरत असून, ते अपघातांना आमंत्रण देत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येथे स्पष्ट दिशादर्शक फलक, चेतावणी बोर्ड आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी होत आहे.
अपघातानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती. या प्रकरणाची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









