पुणे (रिपोर्टर): पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी जाहीरनाम्यात मोफत मेट्रो-बस सेवा, मालमत्ता कर सवलत, टँकरमुक्त शहर, मोफत टॅब, आरोग्य-सुधारणा आणि वाहतूक कोंडी कमी करण्याचे आश्वासन दिले तसेच प्रदूषण कमी करण्यावर भर दिला.
अभिजीत दराडे, पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला जाहीरनामा सादर करताना पुणेकरांना मोठी आश्वासने दिली आहेत. शहराची वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यावर जालीम उपाय म्हणून त्यांनी पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे.
सध्या शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दररोज साडेसात कोटी रुपये इंधनापोटी खर्च होतात, ज्याचा वार्षिक आकडा 10,800 कोटींच्या घरात जातो. हा अवाढव्य खर्च वाचवून तो सार्वजनिक वाहतुकीकडे वळवल्यास रस्त्यावरील खाजगी वाहनांची गर्दी कमी होईल आणि पुणे प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच हा व्यावहारिक प्लॅन मांडला असून, महापालिकेत सत्ता दिल्यास ही मोफत सेवा प्रत्यक्षात आणून दाखवू, असंही अजित पवार म्हणाले. केवळ वाहतूकच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हिताच्या इतर अनेक घोषणाही या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत. 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सवलत देण्याचे आश्वासन पवारांनी दिले आहे. तसेच, संपूर्ण पुणे शहर टँकरमुक्त करणे, विद्यार्थ्यांना मोफत टॅब पुरवणे, शहरातील अपूर्ण रस्ते (मिसिंग लिंक्स) पूर्ण करणे आणि कचर्याचे 100 टक्के वर्गीकरण करण्यावर त्यांनी भर दिला आहे. आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि टेलिमेडिसीन सुविधा सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. याशिवाय 150 मॉडेल शाळांची उभारणी आणि गुंठेवारीचा प्रश्न अवघ्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आम्ही पुण्याचेच असल्याने आम्हाला इथल्या जनतेबद्दल खरी आस्था आहे, बाहेरच्यांना शहराच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत पुणेकरांकडे एक संधी मागितली आहे.













