बीड : मौजे काकडहिरा, ता. जि. बीड येथील गट नं. ३३, ३५ व ३६ मधील शेतजमीन नगर–बीड–परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी शासनाकडून संपादित करण्यात आली. या रेल्वे मार्गासाठी तब्बल १२ ते १५ मीटर उंचीचा मातीचा भराव करण्यात आल्याने परिसरातील पावसाचे पाणी शेतात साचत असून त्यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासन व प्रशासनाकडे अर्ज करून तक्रारी सादर केल्याचे सांगण्यात येते. मात्र, या अर्जांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही, तसेच कोणतेही लेखी उत्तर देण्यात न आल्याचा आरोप शेतकरी सखाराम बळीराम बागलाने (रा. काकडहिरा, ता. जि. बीड) यांनी केला आहे.
शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आणि न्याय न मिळाल्याने मी दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड समोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन सखाराम बागलाने यांनी दिले होते. मात्र, त्या आधीच आज सकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता, त्यांच्या हाताला व पायाला प्लास्टर असतानाही त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेवेळी कलेक्टर कचेरीत उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत प्रसंगावधान राखून त्यांना वेळीच रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
रेल्वे भरावामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि त्यांच्या तक्रारींकडे प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष याबाबत आता शासन कोणती ठोस भूमिका घेणार, याकडे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे









