अंबाजोगाई: रिपोर्टर
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून किरकोळ कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रकार समोर येत आहेत. अंबाजोगाई येथील चनई वडरवस्ती परिसरात केवळ मुलीला का मारले, असा जाब विचारल्याच्या कारणावरून एका ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात विट फेकून मारून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राणी बालाजी राठोड (रा. चनई वडरवस्ती, किरमाणी दर्गाचे पाठीमागे, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एकाच कुटुंबातील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुभाष लष्करे, मंदाकिनी सुभाष लष्करे, विश्व सुभाष लष्करे आणि ईंद्र सुभाष लष्करे (सर्व राहणार चनई वडरवस्ती, किरमाणी दर्गाचे पाठीमागे, चनई, ता. अंबाजोगाई) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी यांच्या मुलीला आरोपीने मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीची आई यशोदा बालाजी राठोड (वय ५० वर्षे) या गेल्या असता आरोपी सुभाष लष्करे याने शिवीगाळ करत त्यांच्यावर विट फेकून मारली. ही विट थेट यशोदा यांच्या डोक्यात लागल्याने त्या रक्तबंबाळ होऊन खाली पडल्या. भांडण सोडवण्यासाठी आलेले रोहन माणिक आडे आणि फिर्यादी राणी राठोड यांनाही आरोपीच्या मुलांनी काठीने बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी झालेल्या यशोदा राठोड यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आयसीयू वॉर्डात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी सुभाष लष्करे, त्याची पत्नी मंदाकिनी सुभाष लष्करे, मुलगा विश्व सुभाष लष्करे आणि ईंद्र सुभाष लष्करे (सर्व रा. चनई वडरवस्ती, अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल होता, मात्र महिलेच्या मृत्यूनंतर यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब फड करत आहेत. पोलिसांनी आरोपी सुभाष लष्करे याला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
यशोदा राठोड यांच्या मृत्युनंतर त्यांच्या नातेवाईकांनी सर्व आरोपींच्या तत्काळ अटकेची मागणी करत बुधवारी सकाळी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलीस निरिक्षक शरद जोगदंड यांनी लवकरात लवकर आरोपींच्या अटकेची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले











