गणेश सावंत
अखंड हिंदुस्तानच्या लोकशाहीचा सूर्य अस्ताकडे मार्गक्रम करतोय का? हा प्रश्न पडण्याचे प्रमुख कारण जो देश लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी चालवलेला लोकशाहीचा देश आहे त्या देशात आज लोकशाहीने दिलेल्या अधिकाराची थेट हत्या होते. सरकारच्या धोरणांविरोधात इथे कोणी बोललं तर त्याला थेट देशद्रोही ठरवलं जातं. कोणी आंदोलन केलं तर ते आंदोलन चिरडलं जातं, कोणी उपोषण केलं तर त्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जातं. आंदोलनाला अधिकची धार निर्माण झालीच किंवा तशी परिस्थिती निर्माण होऊ लागली की त्या उपोषणकर्त्याला रात्रीच्या किंवा पहाटेच्या अंधारात फरफटत ओढत नेत दवाखान्यातल्या नजरकैदेत ठेवलं जातं. परंतु त्या आंदोलनकर्त्याच्या मागणीला महत्व दिलं जात नाही, त्याला न्याय मिळत नाही. अखेर त्या व्यक्तीला सत्ताधार्यांकडून बदनाम केलं जातं. मग मला सांगा, हा देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो का? त्या संविधानाची इथे रोज हत्या होते की नाही? लोकशाहीचे वस्त्र परिधान केलेल्या भारतमातेचेच इथे वस्त्रहरण होते की नाही? कालचा विषय घ्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर पर्यावरणवादी सोनम वांगचूक हे 21 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. नीट परीक्षेत झालेला गोंधळ, 20 ते 25 विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या याची जबाबदारी स्विकारून मोदी सरकारमधील शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही त्यांची मागणी. मात्र सत्तेची मसलपॉवर म्हणण्यापेक्षा थेट मस्ती पांघरुण बसलेल्या केंद्र सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावासा वाटला नाही. 20 ते 25 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दुखवटा प्रधानांच्या राजीनाम्यातून व्यक्त करावासा वाटला नाही.
हा निर्ढावलेला पणा
येतो कुठून?
2014 पासून आजपावेत केंद्र सरकारने आणि प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीने या देशात ज्या पद्धतीने कार्यप्रणाली अंमलात आणली आहे ती हुकूमशाही वृत्तीच. ‘हम करे सो कायदा’ ‘आम्ही म्हणू ती पुर्वदिशा’ या थाटात केंद्र सरकार म्हणण्यापेक्षा मोदी-शहा यांची वागणूक देशहिताची की देश बुडवायची, यावर चिंतन-मंथन होण्यापेक्षा कार्यपद्धतीतला निर्ढावलेला पणा येतो कुठून? याचं उत्तर खरंतर शोधलेला बरं. आम्ही वाचलय, जेव्हा मोहन करमचंद गांधी नावाचा सात वर्षाचा मुलगा हा राजा हरिश्चंद्राचं नाटक पाहण्यासाठी जातो, नाटक पाहून तो जेव्हा घरी येतो तेव्हा राजा हरिष्चंद्राची ती उदारता, तो त्याग, ती सहिष्णुता मोहन करमचंद गांधींच्या मनावर एवढी ठासून बसते की पुढे जाऊन हा मोहन करमचंद गांधी नावाचा मुलगा सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत या देशाचा नव्हेतर जगाचा महात्मा होतो. परंतु आमचे पंतप्रधान जर गाझा पट्टीत पन्नास हजार लहान बालकांची कत्तल करणार्या नेत्यान्याहू अन् इराणच्या शाळेवर बॉम्ब टाकून दोनशे मुलींचे प्राण घेणार्या डोनाल्ड ट्रम्प यांचे फॉलोअर्स असतील, यांचे समर्थक असतील तर मग त्यांच्याकडून सत्य आणि अहिंसा, न्याय याची अपेक्षा करावी का? देशात एखादा हत्ती मेला तर त्याला 40 करोडची नुकसानभरपाई आणि इथे शेतकरी मेला तर त्याला सरकारकडून लाखाची मदत हा जो विरोधाभास भाजपाच्या राज्यात पहायला मिळतोय तो निर्ढावलेला पणाच. याच विरोधात
सोनम वांगचूक
या पर्यावरणवाद्याने आज सरकारविरोधात आवाज उठवलाय. कोण आहेत सोनम वांगचूक? लेहलद्दाखच्या अन् हिमालयातल्या कुशीत निपजलेले भारतीय सैनिकांसह विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि भविष्य घडविणारे सोनम वांगचूक या देशाचे चमकते सितारे म्हणावे लागतील. कधीकाळी भारतीय जनता पार्टीने सोनम वांगचूक यांना डोक्यावर घेतले होते. त्यांना पुरस्कार देऊन सन्मानीत केले होते. परंतु आज सोनम वांगचूक हे सरकारच्या चुकीच्या ध्येय-धोरणाविरोधात बोलायला निघाले तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. आता नीट परिक्षेतल्या घोटाळ्या प्रकरणात जबाबदारी स्विकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी ते उपोषणाला बसले, गेल्या वीस दिवसांच्या कालखंडात ते सरकारचं ऐकतील, असे सत्ताधीशांना वाटले, मात्र सोनम वांगचूक हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्यांविरोधात आक्रमकपणे उभे असल्याचे पाहून भाजपाने अखेर शेवटचा नव्हेतर
रडीचा डाव
खेळायला सुरुवात केली. सोनम वांगचूक ऐकत नाहीत, सरकारविरोधात ते उपोषणाला बसले आहेत, हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आहे, तरुणांसाठी आहे, एकदा देशातला तरुण जागा झाला तर दिल्ली तक्ताला त्याचे हादरे बसणारच. सत्ताधारी हे उमजून आहेत. म्हणून सर्वप्रथम 21 दिवसांच्या कालखंडात सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची, आंदोलनाची बातमी देशवासियांपर्यंत जाणार नाही, याची दक्षता गोदी मिडियामार्फत घेण्यात आली. मात्र सोशल मिडियाच्या ताकतीपुढे गोदी मिडियाचेच वस्त्रहरण होऊ लागले. आंदोलन लोकांपर्यंत गेले आहे, देशातला युवक जागा होत आहे हे पाहिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचूक किती देशविरोधी आहेत, ते कसे देशद्रोही आहेत यावर प्रचार सुरू करण्यात आला. भाजपाच्या आयटी सेलने ‘वांगचूक बदनाम’ मोहीम हाती घेतली. यात भाजपाचे नेतेही मागे नाहीत. मनोज तिवारी नावाचा भोजपुरी कलाकार जो की भाजपाचा नेता आहे जो चित्रपटांमध्ये अश्लील, संस्कृतीहिन गाण्यांवर नाचतो, अंगविक्षिप्त हावभाव करतो तो सोनम वांगचूकसारख्या व्यक्तींवर टीका करतो. ते चीनचे हस्तक आहेत, अन्य काहीबाही. आम्हाला आश्चर्य याचं वाटतं, राममंदिरातील चोरीचे समर्थन करणारे हे लोक, आमच्या हिंदू मंदिरातले पैसे हिंदूंनीच चोरले, त्यामुळे कुणाच्या पोटात का दुखावे? असा तर्क मांडणारे भाजपेयी सोनम वांगचूकच्या विरोधात बोलतायत. अक्कलशून्य जेव्हा होते तेव्हा सत्य दिसत नसते. तीच स्थिती आज भक्तांची झालीय. तिथे न्यायासाठी उपोषण करणे किती जिक्रीचे म्हणावे. तेही
सत्ताधिशांच्या
या स्वभावात
आता गुण-दोष काय विचारशी ।
मी तो आहे राशी पातकांची ।
पतीत पावना सवे समगम ।
आपला धर्म चालवि जे।
घणघाय भेटी लोखंड परीस ।
तरी अनारीसा न पटे ।
तुका म्हणे, माती कोण पुसे फुका
कस्तुरीच्या संगे वास येई
जगद्गुरू संत तुकोबा या अभंगातून म्हणतात, एखादा माणूस जर जन्मजात पापी आणि दुर्जनी असेल तर त्याला पारस लावला तरी त्याचा मूळ स्वभाव बदलणार नाही. ज्याप्रमाणे लोखंडाचा खरा गुणधर्म तो लोखंड असणेच असतो त्याप्रमाणे निर्ढावलेल्या माणसाचे मन वाईट विचाराने पक्के झालेले असतात. त्याच्यावर चांगल्या विचारांचा किंवा संतांच्या उपदेशाचा तत्कालीन परिणाम होत असला तरी त्याचा मूळचा दुष्ट स्वभाव सहजासहजी बदलत नाही. गेल्या बारा वर्षांच्या कालखंडात सत्ताधीशांनी देशात जी स्थिती निर्माण करून सोडली, लोक मुलभूत प्रश्नांसाठी, आपल्या न्याय-हक्कांसां गुहार देत आहेत. परंतु सत्ताधीश लोकांच्या मूळ प्रश्नांना उत्तर देत नाहीत. मंदिर-मस्जिद, जात-पात-धर्म यात लोक कसे अडकतील याची तंतोतंत काळजी सत्ताधिशांकडून घेतली जाते. परंतु आज सोनम वांगचूकसारखे पर्यावरणवादी, तरण्याबांड पोरांच्या न्याय-हक्कासाठी जेव्हा आपला जीव पणाला लावत आहेत तेव्हा तरण्याताठ्या पोरांना सत्य आणि न्यायाचे सुवर्णकिरण दिसत आहेत. आता फक्त सत्ताधिशांना खरचं देशहितवादी म्हणवून घ्यायचं असेल तर त्यांनी आधी अहंकार सोडावा. या देशातल्या गोरगरिबांसह शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, आज बलिदानासाठी जो तो जंतरमंतरवर अन्न त्यागाला बसलाय. उद्या तरण्याताठ्या पोरांनी त्यागाचा विचार केला तर परंतु ते तरणेताठे पोरं त्याग करतील कशाचा? अहिंसेचा तर नव्हे!









