गणेश सावंत
‘शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं’ हा संवाद नुताच प्रसिद्ध झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातला. जिवाजी महाले हे पात्र साकारणार्या सलमान खान यांच्या तोंडून हा संवाद बाहेर पडला, की चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट आणि जय जिजाऊ जय शिवरायांचा निनाद होताना दिसून येतो. पाहणार्या प्रत्येक प्रेक्षकाची छाती ‘छप्पन इंचा’पेक्षा कित्येक पटीने मोठी होते. नव्हे नव्हे ती छाती निधडीच असते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपूत्र, अभिनेते रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची राज्यात नव्हेतर देशात चर्चा सुरू आहे. तोंडभरून या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे कौतुक केले जात आहे. आम्हीही या चित्रपटाचे आणि रितेश देशमुख यांचे कौतुकच करू. चित्रपटात ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे चुलते संभाजी महाराज इथपासून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रात छत्रपतींबाबत ज्या पद्धतीने मांडणी सुरू आहे त्या मांडणीला छेद देत काही प्रमाणात छत्रपतींच्या इतिहासाचा वाद या चित्रपटातून दुर्लक्षित झाला. खरं पाहिलं तर छत्रपतींचा इतिहास मांडणार्यांनी छत्रपतींना विशिष्ट धर्माचा विरोधक दाखवण्याचा प्रयास केला खरा, परंतु सत्य हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि सत्यच असते. म्हणून
छत्रपती शिवराय हे
कूळवाडी भूषणच
आणि बहुजनांचे, रयतेचे राजेच होते, आहेत. हे कोणीही नाकारू शकणार नाही. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणत छत्रपती शिवरायांनी अन्याय-अत्याचाराच्या साखळदंडात अडकलेल्या मराठी मातीतील प्रत्येकाला स्वाभिमान देण्याहेतू स्वराज्य उभारले. हे स्वराज्य उभारताना छत्रपतींना सर्वात आधी स्वराज्यातल्या स्वकियांना दंडात्मक कारवाईतून माणसात आणावं लागलं. मग रांझेगावचा पाटील असो अथवा दस्तुरखुद्द छत्रपतींचे सगेसोयरे असतो. जो स्वराज्याला विरोध करेल, जो स्वराज्य निर्मितीच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न करील तो प्रत्येक व्यक्ती छत्रपतींनी नुसता अंगावर घेतला नाही तर शिंगावर घेऊन हे स्वराज्य उभे केले. एकीकडे मोघल, पोर्तुगीज, डच, नव्हे नव्हे तर इंग्रजही स्वराज्य उभारणीला अनेकदा आडवे आले. ते तसेच कापले. इथे काही धर्ममार्तंड गेल्या वर्षानुवर्षांपासून अफजल खानाच्या वधातून शिवरायांचं हिंदूत्व दाखवण्याचा प्रयास करतात मात्र त्याच दरम्यान, त्याच भेटीत प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलचं पोट फाडल्यानंतर त्याच्या सोबत असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हाही छत्रपतींनी उभा चिरला हे सत्य नाकारता येत नाही. म्हणूनच छत्रपती शिवराय हे कुळवाडी भूषण, बहुजनांचे राजे, बहुजन प्रतिपालक म्हणून ओळखले जात असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे. आज महाराष्ट्रामध्ये
शिवाजी कोण होता?
स्व. गोविंद पानसरे लिखित पुस्तकावरून वाद सुरू आहे. 1980 च्या दशकामध्ये लिहिले गेलेले हे पुस्तक आणि त्यावरून निर्माण झालेले वाद आजचे नाहीत. मात्र या वेळेस ज्या आमदारामुळे हा वाद उभा राहिला ते संजय गायकवाड यांना खरचं छत्रपतींच्या इतिहासाबद्दलची माहिती आहे का? कारण त्यांनी प्रकाशकाला ज्या पद्धतीने शिवीगाळ केली, त्याची आय-माय उधडली. यावरून हे आमदार महोदय, छत्रपतींचे पाईक असूच शकत नाहीत. सत्य आम्हा म्हणी नव्हे गबाळ्याचे धनी देतो तिक्ष्ण उत्तरे पुढे व्हावी, यासे बरे’’ जगदगुरू संत तुकोबा यांचा सिद्धांत आणि छत्रपतींचा मावळा म्हणून जो कोणी जगत असेल तो वैचारिक मतभेदांना वैचारिकतेतून उत्तरे देईल, मात्र संजय गायकवाडांसारखे लोप्रतिनिधी जेव्हा कंबरेचं सोडून मस्तकाला बांधतील तेव्हा खरचं त्यांना छत्रपती शिवराय कळले का? ते शिवरायांचे मावळे आहेत का? पानसरेंच्या पुस्तकाच्या नावाबाबत वाद असू शकतात, मात्र छत्रपती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर केवळ आणि केवळ त्यांनी उभा केलेलं स्वराज्य पाहितलं किंवा आत्मसात केलं की मिळून जातं. शेती असेल, सिंचन असेल, युद्ध असेल, तह असेल अथवा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकक, सांस्कृति किंवा धर्म असेल यावर छत्रपतींच्या स्वराज्यात माणसाला माणूस म्हणून बघण्याची शिकवण होते. म्हणूनच राजे कोण होते किंवा राजेंचं एकेरी भाषेत शिर्षक असलेलं पुस्तक म्हणून वाद करणं हा निव्वळ वैचारिक वांझपणाच.
महाराजांना समजून घ्यायचं
तर आधी जिजाऊंना समजून घ्यावं लागेल, शहाजी महाराजांना समजून घ्यावं लागेल. तेव्हाच्या परिस्थितीला समजून घ्यावं लागेल आणि त्या परिस्थितीत जिजाऊ माँ साहेबांनी जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नाला उमजावं लागेल. जिजाऊंचा स्वप्न साकार करणार्या छत्रपतींच्या प्रत्येक गोष्टीला, व्यूहरचनेला, गनिमी काव्याला आपलंसं करावं लागेल. छत्रपतींचं स्वराज्य तलवारीच्या पात्यावर पेलवणार्या आणि ते स्वराज्य अधिक वाढवणार्या छत्रपती संभाजी महाराजांनाही तितच दखलपात्र घ्यावं लागेल. मात्र दुर्दैवाने बहुजन प्रतिपाल असणारे छत्रपती शिवराय आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह महाराष्ट्रातल्या संत परंपरेला आणि छत्रपतींच्या वैचारिक स्वराज्याला जाणीवपुर्वक छेडण्याचे काम काही धर्मांध शक्ती करत असल्याचे दिसून येते. काल-परवा स्वामी आनंदस्वरुप नावाचा कोण एक तथाथीत महाराज याने छत्रपतींनी लढाया केल्या नाही, पेशव्यांनी केल्या, असे म्हणत बराबरी करण्याचा प्रयत्न करून माथी भडकवण्याचे काम करतात. कधी तुकारामांना खुजं करण्याचं काम तर कधी छत्रपतींच्या कार्याला खुजं करण्याचा प्रयास या तथाकथीतातून केला जातो. म्हणून जो छत्रपतींचा मावळा आणि तुकोबांचा वारकरी म्हणवून घेणार्या प्रत्येकाने
सह्याद्रीची घोडदौड
केली पाहिजे. छत्रपतींचा इतिहास वाचला पाहिजे. त्या इतिहासाच्या अनुषंगाने इतिहासाच्या पाऊलखुणा सापडत वर्षातून एकदा तरी छत्रपतींच्या दोन-तीन किल्ल्यांना भेटी देत छत्रपतींना अनुभवयाचा प्रयत्न करा. सह्याद्रीच्या काळ्या कातळ दगडांशी बोला, तेथील नद्या-नाले, झाडे-झुडपे, गडकोटांचे बुरजं यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तेव्हा नक्कीच खरे छत्रपती दिसतील. मग कुणा धर्मांध भामट्यांच्या वक्तव्याचा खास समाचार घेता येईल. आधी वाचलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे आणि नंतरच छत्रपतींच्या बाबत, इतिहासाबाबत बोललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? ते महाराष्ट्राचे बाप होते? खरंय का!!!










