बीड (रिपोर्टर) मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी चौदा लाख रुपये लुबाडल्याची घटना परळीत उघडकीस आली होती. प्रकरणी दोन भामट्यांविरोधात संभाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन भामट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश चाटे यांनी केली.
मनिषा नंदकुमार फड (रा. माधवबाग परळी) यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पुणे येथून युवराजसिंग ऊर्फ सोनुकुमार आणि नितांत गायकवाड (रा. पुणे) या दोघांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त केला. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पो.नि. सुरेश चाटे, उपनिरीक्षक चांद, मेडके, सचिन सानप, सरवदे यांनी केली.