बीड (रिपोर्टर)- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच क्षेत्रात काम करत असताना पत्रकारितेतही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. आज खर्या अर्थाने दलित-शोषित आणि पिडीतांचा आवाज ‘मुकनायक’ बनला पाहिजे आणि त्यातून त्याच्या जगण्याचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रमेश लांडगे यांनी केले.

नागसेन बुद्धविहार आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बुद्ध विहारात ‘मुकनायक’ या दिनानिमित्त बहुजन समाजातील पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉ. लांडगे हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी.पी. सिरसाट तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विष्णू वाघमारे, अभिमान दैनिकाचे संपादक राजेंद्र होळकर, सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, नगरसेवक भैय्या मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना लांडगे म्हणाले की, सुमारे 101 वर्षापुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजातील सर्व प्रश्न मांडण्यासाठी मुकनायक हे साप्ताहिक सुरू केले. आजही दैनिक चालवणे किती जिक्रीचे असते आणि त्यातून समाजातील सर्व लोकांच्या व्यथा-वेदना सरकार दरबारी मांडून त्या सोडवण्याचे काम करावयाचे असते. सुमारे 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांनी पहिले साप्ताहिक मुकनायक सुरू केले होते. त्यानंतर प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत आदी वर्तमानपत्रातून त्यांनी वंचित समाजातील समुहाच्या वेदनेला वाट मोकळी करून दिली.

आजही या समस्यांचे स्वरुप बदलले असून त्यांनी वेगळे रूप धारण केले आहे. आजही पत्रकारितेत संपादक आणि पत्रकारांनी मुकनायकाचा आदर्श घेऊन या समस्या सोडवण्याचे काम केले पाहिजे, असे लांडगे यांनी सांगितले. यानंतर सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे गणेश सावंत संपादक राजेंद्र होळकर, पत्रकार ढाकांसह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला यू.एस. वाघमारे, बाबूराव गालफाडे, ओव्हाळ, उमाजी आठवले, समाधान जाधव, श्रीमंत उजगरे, गुलाबराव भोले, प्रा. अशोक गायकवाड, कॅप्टन राजाभाऊ आठवले, व्ही.आर. गाडे, योगेश गावडे, बळीराम चांदणे, टी.जे. कांबळे, राणुजी निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी संपादक राजेंद्र होळकर, गणेश सावंत, पत्रकार ढाका, रमाकांत गायकवाड, संजय धुरंधरे आदी पत्रकारितेत काम करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.