कॉंग्रेस पक्षाची देशात गेल्या दहा वर्षापासून मोठी पिछेहाट होत आहे. ती अद्याप थांबलेली नाही. बोटावर मोजण्या इतक्याच राज्यात कॉंग्रेसची सत्ता उरली. काही राज्यात बंडखोरीमुळे कॉंग्रेस संपली, काही ठिकाणी कशीबशी तग धरुन आहे. कॉंग्रेसचा इतिहास मोठा आणि जुना आहे. कॉंग्रेसचा एक काळ होता आज तो राहिला नाही. कॉंग्रेसमध्ये कार्यकर्ते येण्यासाठी पक्षश्रेेष्ठीकडे रांगा लावून होते. आज कॉंग्रेसमध्ये कुणी येतयं का? याची वाट पाहावी लागते. जे काही नेते, कार्यकर्ते उरले आहेत ते ही इतर पक्षात जाण्याच्या मुडमध्ये असतात. कॉंग्रेसमध्ये नेहमीच राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवरुन ‘रन’ पेटलेले असते. कॉंग्रेसला अजुन राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही. प्रभारीवरच कॉंग्रेसचं काम चालवलं जात आहे. मध्यंतरी काही ज्येष्ठांनी आपली नाराजी जाहीर करुन सोनिया गांधी यांना पत्र लिहलं होतं. या पत्रावरुन बराच हल्ला कल्लोळ झाला होता. ज्येष्ठांना डावलून कॉंग्रेस इतरांना चांगली संधी देत नाही हा आज पर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे अनेक नवतरुण नेते कॉंग्रेसला रामराम करुन दुसर्या पक्षात स्थानबध्द झाले. महाराष्ट्र तसा कॉंग्रेसला पुर्वी सुपीक होता,पण महाराष्ट्रात ही गट-तट निर्माण होवून इथली कॉंग्रेस दुभंगली गेली. महाराष्ट्राने दिल्लीला नेहमीच बळ दिलेलं आहे. त्यामुळे दिल्लीचं लक्ष महाराष्ट्रकडे लागलेलं असतं. जी अवस्था देशातील कॉंग्रेसची आहे, तीच अवस्था महाराष्ट्रात कॉग्रेसची आहे.
नवा अध्यक्ष
महाराष्ट्र कॉग्रेसमध्ये बदल करण्यात आले. नाना पटोले यांच्या सारख्या आक्रमक नेत्यांच्या हाती राज्याचे सुत्रे दिले गेले. नाना पटोले हे विदर्भातील आहेत. पुर्वी ते भाजपात होते. २०१४ ची लोकसभा निवडणुक त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लढवली व ते विजयी झाले होते, त्यांना भाजपाचे धोरणं आवडले नाहीत, म्हणुन त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली व कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉग्रेसकडून ते २०१९ ची लोकसभा निवडणुक लढवले पण त्यांचा पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. राज्यात महाआघाडीचं सरकार आल्याने त्यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं. पटोले यांना मंत्री किंवा पक्षाचं महत्वाचं पद द्यायला हवं असा एक सुर होता, त्यावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. महाआघाडी सरकारला एक वर्ष लोटलं. राज्यातील कॉग्रंेस पक्षाला संघटनेत बदल करावा वाटला आणि हायकमांडने राज्यातील पक्ष नेतृत्व बदललं, आणि प्रदेशाध्यक्षपदाची माळ पटोले यांच्या गळ्यात टाकण्यात आली. पटोले यांचा विदर्भात चांगला दबदबा आहे. २०१९ ची लोकसभा निवडणुक त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवली होती. त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांची चर्चा सर्वत्र झाली होती. नुकत्याच स्थानिक स्वराज्य,पदवीधर,शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने चांगले यश मिळवले, त्यातच नागपुरची जागा जिंकल्याने कॉंग्रेस पक्षात चांगलंच बळ आलं. पक्ष वाढीसाठी आणखी जोर लावला पाहिजे हाच विचार पुढे करुन पाटोले यांना पक्षाचं राज्याचं पद देवून मौदान गाजवण्याच्या सुचना करण्यात आल्या असाव्यात.
सध्याची कॉंग्रेस
सत्ता अनेक वर्ष भोवती फिरत राहिली की, संघटनेत जीव ओतून काम करण्यास सत्ताधारी टाळाटाळ करत असतात. राज्यातील लोकांनी कॉग्रंेस पक्षाला भरभरुन दिलं. मात्र कॉंग्रेसच्या नेत्यांना पक्ष वाढण्यास वेळ मिळाला नाही. कॉंग्रसेचं जहाज जेव्हा बुडू लागलं. तेव्हा अनेकांनी त्यातून उड्या मारुन पळ काढला व दुसर्या पक्षाचा सहारा घेतला. राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य काही नेते असतील या सर्वांनी गत निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पाठ दाखवली. ज्या-ज्या नेत्यांनी कॉंग्रेसमधून पळ काढला. त्या नेत्यांची आज अवस्था वाईट आहे. बडे नेते कॉंग्रेस पक्षातून पळ काढत असल्याचे पाहून कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. काही निष्ठावंतांनी मात्र खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. नगरचे बाळासाहेब थोरात,लातूरचे देशमुख,सातार्याचे पृथ्वराज चव्हाण,नांदेडचे अशोक चव्हाण,सोलापूरचे शिंदे, असतील किंवा अन्य नेते यांनी आप-आप आपला गढ सांभण्यासाठी मोठी ताकद लावली. कॉंग्रेसच्या सोबतीला राष्ट्रवादी होतीच, त्यामुळे कॉंग्रेसमध्ये थोडा जीव शिल्लक राहिला होता. नेमक्या किती जागा निवडणून येतात याचीच जो-तो चर्चा करत होता. राज्यातील जनतेनं कॉंग्रेसची नामुश्की होवू दिली नाही. ४४ जागा कॉंग्रेसच्या निवडून आल्या. ४४ जागा पडत्या काळात कॉंग्रेस पक्षासाठी खुप मोठ्या होत्या. राज्यात मोठ्या ताकदीचा नेता नव्हता. दिल्लीच्या नेत्यांनी एक दोन पेक्षा जास्त सभा घेतल्या नव्हत्या, त्यामुळे कॉंग्रेस पुर्णंता गळून पडल्या सारखी झाली होती. वीस जागाच्या पुढे कॉंग्रसला जागा मिळणार नाही असं सांगितलं जात होतं. जिल्हा पातळीवरील नेते आपल्याच विजयीसाठी प्रतिष्ठापणाला लावून होते,त्यामुळे इतर िंठकाणी जाण्यास त्यांना सवड नव्हती. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. मात्र त्यांची अवस्था वाईट आहे. यांना आपल्याच जिल्हयात निवडून येण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. या नेत्यांच्या पाठीमागे जनमत राहिलं नाही. त्यामुळेच राज्यात कॉंग्रेसची अवस्था बिकट झाली.
बाजु सावरली
२०१९ च्या निवडणुकीची अवस्था बिकट होती, पुन्हा कॉंग्रेस सत्तेत येईल का याचा काही नेम दिसत नव्हता. मात्र भाजपा आणि शिवसेनेचं भांडण कॉंग्रेस पक्षाच्या पथ्यावर पडलं. तीन पक्षाचं सरकार का असेना पण सत्तेत सहभागी होण्याची संधी कॉंग्रेस पक्षाला मिळाली. सत्तेत असणं आणि विरोधात असणं यात खुप फरक असतो. सत्तेत राहिलं की, लोकांची आवक वाढते, राजकारणात त्याचा फायदा होतो. सत्तेची विभागणी करतांना कॉंग्रेस पक्षाकडे काही चांगली खाते आली. कॉग्रेसच्या काही नेत्यांचा सत्तेत सहभागी होण्यास विरोध होता. मात्र सत्तेत नसेल तर पक्ष पुन्हा पाठीमागे जाईल हा विचार पुढे आला आणि पक्ष श्रेष्ठीने शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्यास सहमती दिली. ज्यांनी कधी स्वप्नात ही पाहिलं नव्हतं ते कॉंग्रेसमुळे मंत्री झाले. सत्तेच्या सहभागामुळे कॉंग्रेसची जी वाईट अवस्था होती ती थोडी सुधारली जाऊ लागली. अधून-मधून कॉंग्रेसमध्ये नाराजाचे सुर उमटत असतात, तीन पक्षाचं सरकार असलं की, भांड्याला भांड लागणारच आहे. ज्यांना-ज्यांना कॉंग्रेस पक्षाने मंत्रीपद दिले, त्यांचा पक्ष सुधारणेकडे अजुनही तितका कल दिसेना. फक्त मंत्रीपद मिरवण्यात पक्षाचे नेते गुंग आहेत. विरोधाला विरोध आणि सडेतोड उत्तरे देणारा पक्षाकडे राज्यात नेता नाही, किंवा गर्दी खेचणारा चेहरा नाही, त्यामुळे पक्षाला अवकळा येत गेली. पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि आता पर्यंत प्रदेशाध्यक्ष पद भोगलेले बाळासाहेब यांचं तसं दमदार वक्तृत्व नाही, जेणे करुन लोक आकर्षीत होतील, ते प्रशासकीय कारभार पाहण्यापुरते चांगले असू शकतात. मात्र नेता म्हणुन त्यांची राज्यात ख्याती होवू शकत नाही. थोरात यांची नगर जिल्हयात कारर्कीद असू शकते पण राज्यात ते चमत्कार करु शकत नाही. आता पर्यंत ज्येष्ठांच्या जीवावर कसा-बसा कॉंग्रेसचा गाढा ओढला गेला, आता इथून पुढे पक्ष सांभाळणं खुप अवघड झालं आहे. कारण सगळेच समीकरणं बदलले आहेत. बदलत्या समीकरणानुसार कॉंग्रेस पक्ष बदलला नाही तर कॉंग्रेसचं अवघड आहे.
पुढील आव्हाने
राज्यात भाजपा हा प्रबळ पक्ष होत आहे. गत निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या. निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाची बांधणी तितकीच महत्वाची असून पक्ष बांधणी केली नाही तर आगामी निवडणूकीत पुन्हा मोठा तोटा होईल याचा अंदाज पक्षाच्या हायकमांडला आला, त्यामुळे राज्यात खांदेपालट करण्यात आली. पक्षाचं नेतृत्व चांगलं असेल तर पक्ष वाढतो आणि पक्षाचं नेतृत्व लेचपेचं असेल तर पक्षाचं भवितव्य अंधारात असतं. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कॉग्रंेस पक्षाची मोठी वाताहत झालेली आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा जागा असतांना फक्त एक जागा कॉंग्रेस पक्षाला मिळाली हा खुप मोठा पराभव आहे. एक काळ असा होता. महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त जागा कॉग्रेस पक्षाच्या निवडून येत होत्या. आज त्याच्या उलट झाला. शुन्याचा आकडा गाठला जातो म्हणजे पक्षाचं राज्यात काही काम आहे की नाही असं असाच त्यातून संदेश जातो. कॉंग्रेस पक्ष जुना आहे, शिस्तीचा आहे. मात्र पक्षाचं राज्यात काही अस्तित्वच नसेल तर काय फायदा? गावपातळीवर पक्षाची बांधणी नाही. नगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे नगर सेवक निवडून येत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये ही तीच गत आता पर्यत पहावयास मिळाली. येत्या काही महिन्यावर राज्यात नगर पालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीत पक्षाला आपली ताकद दाखवावी लागेल. नाना पटोले हे अभ्यासू आणि राज्याच्या प्रश्नांची जाण असणारे मुरब्बी नेते आहेत. अशा नेत्याच्या हाती राज्यातील कॉंग्रेस पक्षाची सुत्रे देण्यात आली. कॉंग्रेस राज्यात सत्तेत असली तरी संघटनेच्या बाबतीत कॉग्रंेस सक्षम नाही. भाजपा,राष्ट्रवादी,शिवसेना या पक्षाचं संघटन चांगलं असतं. तसं संघटन कॉंग्रेसला करावे लागणार? नवे अध्यक्ष पटोले यांना पक्षांची बांधणीची सुरुवात गाव पातळीपासून करावी लागणार. पक्षात जीव आणण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. तेव्हा कुठं पक्ष बांधणी बळकट होत असते. पटोले यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडली, ते आपली जबाबदारी कशा पध्दतीने पेलतात आणि पक्षाला किती बळकटी आणतात हे येणार्या काळात दिसेल, पटोलेे यांच्या समोर मोठे आव्हान आहे, हे आव्हान म्हणजे कठीण घाटच!