Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- मराठी भाषा भिकारीन नाही…. मंत्रालयाच्या दारात कुठपर्यंत ताटकळत ठेवणार?

अग्रलेख- मराठी भाषा भिकारीन नाही…. मंत्रालयाच्या दारात कुठपर्यंत ताटकळत ठेवणार?


गणेश सावंत
९४२२७४२८१०

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जहालो खरे धन्य ऐकतो मराठी
धर्म-पंथ-जात एक तो जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी भाषेचा गुणगौरव करणारे सुरेश भट्ट यांची ही कविता वाचली किंवा कानावर पडली की आईच्या कुशीत विसावल्यागत वाटतं. माय मराठी आज मंत्रालयाच्या दारात भिकारण म्हणून उभी आहे की काय? हा सवाल पुन्हा-पुन्हा उपस्थित करावासा वाटतो, हा सवाल गेल्या कित्येक दशकापासून केला जातोय. माधव ज्युलियन या कवीनेही तोच सवाल परखड भाषेत विचारला होता. आतापर्यंत जे-जे सरकार आले त्या त्या सरकारने मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले. पंरतु आज राज्यात मराठी भाषेसह भाषिकांच्या विषयावर राजकारण, समाजकारण करत आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यात सत्ता मिळाली आहे, जे ठाकरे कधीही राजकारणात येणार नाहीत, असे वाटत असताना दस्तुरखुद्द ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. आता आता मराठी भाषेला न्याय मिळेल अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करायला हरकत नाही. काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘मी मराठी माझी मराठी’ हा बाणा जपुया असे आवाहन करत एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊया, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही, तेच पाहू, असं ठणकावत पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारच, असे आश्वासन उभ्या महाराष्ट्राला दिले. ते आश्वासन पुर्णत्वाकडे जावो ही अभिलाषा व्यक्त करत कित्येक वर्षांपासून मंत्रालयाच्या दारात भिकारीन म्हणून उभी असलेल्या मराठी भाषेला श्रीमंती मिळावी, तीही तिच्या धारदार, बहारदार, शब्दो व्यक्तामुळे

मराठीचं महत्त्व काय,
आईचं दुध हा जिवनाचा पाया आहे आणि आईची भाषा हा शिक्षणाचा पाया आहे, मराठी ही आमची आईची भाषा, अर्थात मातृ भाषा आहे. मातृ भाषेतून शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या जुल्माविरुद्ध बंड पुकारले आणि स्वराज्य स्थापन केले. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानाचा खजिना कडीकुलुपात ठेवलेल्या देववाणी संस्कृतला आव्हान दिले आणि अमृतातही पैजा जिंके,’ ऐसे अक्षर मिळविन हे ध्येय मराठी भाषिकांसमोर ठेवत मर्दाच्या मरणाचे मार्ग दाखवणारा श्रीकृष्णाच्या भगवद्गितेला मराठीत अनुवादित करून ज्ञानेश्‍वरी जगासमोर आणली. कित्येक वर्षाची संस्कृतच्या मक्तेदारीचा किल्ला ज्ञानेश्‍वरांनी उद्ध्वस्त केला आणि सोजवळ मराठी भाषा खळखळ वाहणार्‍या निखल पाण्यासारखी उभ्या जगाला दाखवून दिली. आज आपण आईचं दुध हे मुलासाठी कसं अमृत असतं आणि जन्मल्याबरोबर दोन तासात आईचं स्तनपान मुलाला करावं, असं सांगतो तसं मातृभाषाही शिक्षणाचा पाया असणारा आहे. त्यामुळे या भाषेचा गुणगौरव झालाच पाहिजे. आज मराठी भाषा दिन म्हणून दिवस साजरा करत असलो तरी मराठी भाषेबाबत आपण तेवढ्याच तळमळीने या भाषेकडे पाहतो काय, हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्‍वर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा चमत्कार, ज्या संस्कृत भाषेची मक्तेदारी एक हजार वर्षांहून अधिक काळ सुरू होती त्या संस्कृतची मक्तेदारी अवघ्या १८ वर्षांच्या ज्ञानेश्‍वरांनी मोडली आणि मराठी भाषेत श्रीकृष्णाची भागवद्गिता सांगितली. ते सांगताना मराठी


भाषेतलं सोजवळपण
जसं माझा मराठीची बोलू कौतुके | परी अमृतातेही पैजा जिंकेल ऐसे अक्षर मिळवील | एक हजारहून अधिक वर्षे ज्या संस्कृतने चोहुबाजुने नाकाबंदी केली त्या संस्कृतची मिरासदारी मराठी भाषेने मोडून काढली. मग इंग्रजीचे काय घेऊन बसलात. मराठी भाषेत एक म्हणती मराठी काय, हे तो भल्याशी ऐकू नये, ती मुर्खे नेनती सोय अर्थान्वयाची जसे आहे तसेच तुकोबांच्या भाषेत मराठी भाषेतलं सोजवळपणाबरोबरच आक्रमकता आपल्याला त्यांच्या अभंगातून पहावयास मिळते. महाराष्ट्राच्या मना-मनावर अधिराज्य करणार्‍या संत तुकोबांनी मराठी भाषेचा जहालपण
भले तरी देव कासेची लंगोटी
नाठाळाच्या काठी हाणू माथी
माय-बापाहुनी बहु मायावंत
करू घातपात शत्रूहुनी
या अभंगापाठोपाठ याच अभंगात ते पुढे म्हणतात,
मऊ मेनाहुनी आम्हा विष्णुदास कठीण वज्रास भेदू’ मराठी भाषेतला सोजवळपणा आणि आक्रमकपणा जेवढा मनाला भावतो, तो उमजून येतो तेवढा अन्य भाषेत उमजून येत नाही. विख्यात नाटककार श्रीपाद कोहेटकर यांनी मायभूमीबद्दल उत्कट केलेल्या प्रेमाचं दर्शन या ओळीत आपल्याला खास पाहता येईल.
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा
दुसरीकडे फादर स्टिफन्स यांनी ख्रिस्त पुरानात मराठी भाषेबाबत जे गौरवोद्गर काढले ते आश्‍चर्यकारकच.

स्टिफन्स म्हणतात,
पखियामध्ये मयरु | वृखियामध्ये कल्पतरु|
भासांमध्ये मानु थेरू | मराठीयेशी |
असे किती उदाहरण द्यायचे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीनंतर जेव्हा दलितांच्या व्यथा व वेदना साहित्यिक बोलू लागले तेव्हा मराठी भाषेचं महात्म्ये सर्वांनाच समजलं आणि उमजलं. कवि यशवंत मनोहर हे साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये दलितांच्या वेदना तेंव्हा मांडायचे. त्यांनी म्हटलं,
काल पडलेला पाऊस माझ्या शेतात पडलाच नाही
सदरहु पिक आम्ही आमच्या आसवावर काढले
या पंक्तीतून मराठी भाषेचं प्रेम आणि मराठी भाषेतले शब्दांचे शस्त्र अनुभवयास येते. आज महाराष्ट्रात १२ कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. या लोकांच्या घरामध्ये खरच मराठी भाषेचं प्रेम आहे का? हा सवाल एवढ्यासाठीच करावासा वाटतो, कारण आजकाल आमच्या घराघरांमध्ये हाय-बाय आणि टाटाचे जणू वर्गच सुरू झाले आहे. असल्या हाय बाय टाटा करणार्‍या इंग्रजी मॅडमला घरामध्ये घुसू द्यायचे काय? या प्रश्‍नावर आम्ही तर नामदेव ढसाळांच्या भाषेत उत्तर देऊ. नामदेव ढसाळ म्हणायचे, हाय बाय करणार्‍या, ढुंगण हलवित चलणार्‍या इंग्रजी मॅडमला आम्ही आमच्या घरात घुसू देणार नाही, एकीकडे मराठी भाषेवर भाष्य करताना


इंग्रजी भाषेचा सहारा

आज घेतलेला नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मराठी भाषेबाबत बोलताना म्हटलं होतं, आतंर प्रांती व्यवहारासाठी केंद्र सरकार कोणती भाषा ठरवतेय याची राज्य सरकारांनी वाट पाहण्याची गरज नाही त्यामुळे सुधारणा लांबणीवर पडणार आहे. कारण फक्त वाद-विवाद होईल या वादविवादातून दुसरे काहीही निष्पन्न होणार नसून इंग्रजांना मागच्या दरवाज्याने प्रवेश मिळणार आहे, तसे झाल्यास तो भारताला कायमचा कलंक ठरेल. तेव्हा पहिले पाऊल म्हणजे सरकारी कचेरीतून प्रादेशिक भाषेचे पुनरुज्जिवन करण्यात यावे. पंडित जवाहरलला नेहरू यांनी तुरुंगातून आपली कन्या हिला हे पत्र लिहिले होते. त्यावर पंडित नेहरू म्हणतात, मी हे पत्र तुला इंग्रजीतून लिहित आहे, हे किती हास्यास्पद! स्वातंत्र्यानंतर आपले सर्व व्यवहार लवकरात लवकर आपआपल्या भाषेत केले पाहिजे. (वरील अनुवाद खांडीलकरांच्या पुस्तकातून) जसं, पंडित जवाहरलाल नेहरुंना भाषेबाबत दुरदृष्टीने पाहता येत होतं तसं महात्मा गांधींनी महाराष्ट्रात मराठी भाषेतच सर्व कारभार आणि व्यवहार झाला म्हणजे मराठी माणूस राज्याच्या विकासाच्या वाटचालीत जला माजी मासा तैसा वावरे’ तसं यशवंतराव यांनीही ७ सप्टेंबर १९६७ रोजी के.जे. सोमय्या आर्टस् व कॉमर्स कॉलेजची पाया भरणी करताना शिक्षणाच्या माध्यमाबाबत जे विचार मांडले ते मराठी भाषेचा उद्धार करणारेच होते. अनेक लेखक, साहित्यिक यांनी मराठी भाषेचा नुसता गुणगौरवच केला नाही तर या भाषेमुळे आईच्या दुधाचे महत्त्व दिले आहे. परंतु आजमितीला या भाषेचं काय होतय आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयात ही भाषा कशी लटकवली जातेय, हे दिसून येते.


आईच्या दुधात रोग प्रतिकारक शक्ती
जशी आहे तशीच मराठी भाषेतही प्रतिकारक शक्तीच म्हणावी लागेल. धैर्य, संघर्ष आणि यशाची पताका याच भाषेतून फडकवता येईल हेही तेवढेच खरे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके नंतर मिळते भाकर. हे जे सत्य वचन मराठीतूनच सांगता येतं ते अन्य भाषेतून सांगता येणार नाही. गड आला पण सिंह गेला’ अथवा स्वराज्य व्हावे ही तर श्रींचीच इच्छा’ हे जे पराकोटीचे ध्येय-वचन आहेत हे इंग्रजी भाषेत ऐकतानाही रोमांच येणार नाही. अंगातलं रक्त सळसळणार नाही. धैर्य तर नाहीच येणार ते फक्त मराठी भाषेतच सांगितलं तर आमच्या मुलांना कळणार. कारण आईचं दुध ते आईचं दुधच आणि बाटलीतलं दुध ते बाटलीतलं दुधच. शब्दाचा महिमा हा मराठी भाषेत जेवढा दखलपात्र आणि रत्नासारखा व शस्त्रासारखा धारदार तो अन्य भाषेमध्ये दिसून येत नाही. तुकोबांनी यावरही आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमच्या जिवाची जिवन शब्द वाटू जनधन लोका’ यातून मराठी भाषेतल्या शब्दातले रत्न आणि शब्दातले शस्त्रं उघड केले. परंतु त्याच मराठी भाषेला आजही मंत्रालयाच्या दारात आणि घराघरात भिकारीन म्हणून वावरावे लागत असेल तर ते दुर्दैव नव्हे काय? आता मराठी भाषेला भिकारीन म्हणून वावरू देऊ नये, तोच महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान बरोबर संस्कृतीही असेल.

Most Popular

error: Content is protected !!