वरिष्ठ नेते अनुकूल
मुंबई (रिपोर्टर) विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कुठल्या पक्षाकडून कुणाची वर्णी लागणार? यावर तर्कवितर्क आणि चर्चा होत असतानाच लोकसभा निवडणुकीत मातब्बर भाजपाच्या उमेदवाराशी तगडी फाईट देत देशपातळीवर चर्चेत राहिलेले बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर घेण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा होत असून पक्षश्रेष्ठीतील वरिष्ठ नेते अनुकूल असल्याचे बोलले जाते.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधान परिषदेवर दोन जागा असून पक्षाने माजी मंत्री एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. मात्री आता यात आणखी एक नाव आघाडीने चर्चेत येत आहे. ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या बजरंग सोनवणे यांचे. सोनवणे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे मातब्बर उमेदवार यांच्यासोबत तगडी फाईट दिली होती. देशभरात बजरंगी भाई म्हणून चर्चेत राहिलेल्या बजरंग सोनवणेंना नंतर पक्षाने जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. आता सोनवणे यांचे पुनर्वसन करण्याहेतु विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. काल दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी त्यांना हातात धरून गाडीत बसवल्याचेही अनेकांनी पाहिले. पक्षाचे वरिष्ठ नेते बजरंग सोनवणेंबाबत अनुकूल आहेत. या सर्व परिस्थितीवरून बजरंग सोनवणेंच्या गळ्यात विधान परिषद आमदारकीची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. चालू वर्षात कारखान्याच्या माध्यमातून सोनवणे यांनी शेतकर्यांसाठी चांगले काम केले आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम प्रसंगी पक्षाचे नेते था उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘बजरंग सोनवणेंचं मी पाहतो’, असेही म्हटले होते. या सर्व घडामोडीतून सोनवणेंचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची सकारात्मक चर्चा होत आहे.