बीड (रिपोर्टर):-शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहितले जाते. 1970 ते 1990 या दरम्यान दुध संस्थांचं जाळं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भिनलं गेलं होतं मात्र गेल्या 10 वर्षांपासून दुध संस्थांना घरघर लागली.
विविध कारणांमुळे दुध संघासह ग्रामीण भागातील प्राथमिक दुध संस्था मोडकळीस आल्या. काही संस्था बंदही झाल्या आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 74 संस्था अवसायनात आल्या आहेत. या संस्था चालकांनी रेकॉर्ड ठेवले नाही. दुधाचे संकलन बंद केले. निवडणूका घेतल्या नाहीत. यामुळे सदरील संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असल्याने जिल्हा पातळीसह तालुकास्तरावर दुध संस्था निर्माण करण्यात आल्या. या संस्थेच्या माध्यमातून मोठी उलाढालही होत होती. याचा फायदा दुध उत्पादक शेतकर्यांना होत होता. 1970 ते 1990 या दरम्यान दुध संस्थांचे जाळे चांगलेच विनले गेले होते मात्र 1990 च्या नंतर दुध संस्थांना घरघर लागत गेली. संस्था बंद पडत गेल्या. ज्या प्राथमिक स्तरावरच्या संस्था होत्या त्या संस्थेने रेकॉर्ड ठेवले नाही. ऑडीट केले नाही. एकूणच दुधाचे संकलनही बंद केल्यामुळे अशा संस्था सहकार विभागाने अवसायनात काढल्या. बीड जिल्ह्यातल्या 1 हजार 74 संस्था अवसायनात निघालेल्या आहेत. ज्या प्रमाणे बीड जिल्ह्यातील प्राथमिक दुध संस्थांची अवस्था आहे तशीच मराठवाड्यातील संस्थांचीही त्याच पद्धतीची अवस्था असल्याचे पहावयास मिळत आहे. मराठवाड्यातील 49 संस्था बंद पडलेल्या आहेत. संस्था बंद पडत असल्याने दुध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात म्हशीच्या आणि गायीच्या दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत आहे. गायीचे दुध डेअरीच्या माध्यमातून शेतकरी विक्री करत असतात पण दुध संस्थांच सक्षम नसल्याने त्याचा परिणाम दुध उत्पादनावर होत असून त्याचा जबरदस्त फटका शेतकर्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.