लोकाहो, कोरोना अजून गेला नाही, काळजी घ्या; धुलीवंदन साध्या पद्धतीने साजरे करा
-आ. क्षीरसागर
बीड (रिपोर्टर):- कोरोनाने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या माथी लॉकडाऊन मारल्याने सर्वसामान्य त्रस्त असून लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत आहेत. सर्वसामान्यांच्या या मागणीला लावून धरत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंसह जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे लॉकडाऊन उठवण्याबाबत मागणी केली आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी येताच लॉकडाऊन पुर्णपणे उठवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असेही संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षीच्या चार-पाच महिन्याच्या लॉकडाऊनने छोटे-मोठे उद्योग व्यवसायिक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत. आता लॉकडाऊनच्या मानसिकतेत कोणीही नाही. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहेत. परंतु लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असू शकत नाही असं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य जनतेचा आवाज बनत आज आ. संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे जनमाणसांची भूमिका बोलून दाखविली. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी येताच जिल्ह्यातलं संपुर्ण लॉकडाऊन उठवावा, अशी मागणी केली. सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शतेमजूर, छोटे-मोठे उद्योजक आर्थिकदृष्ट्या आधिच कमकुवत आहेत त्यात लॉकडाऊन पडल्यानंतर त्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे आ. संदीप क्षीरसागरांनी सर्वसामान्यांच्या भूमिका शासन-प्रशासन दरबारी मांडली. कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे स्वत:ची आणि कुुटुंबाची काळजी घ्या, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, धुलीवंदन साध्या पद्धतीने घरीच साजरे करा, असे आवाहनही आ. क्षीरसागर यांनी या वेळी केले.