अकरा महिन्यात अडीचशे शेतकर्यांनी संपवले जीवन
बीड (रिपोर्टर) शेतकर्यांभोवतीचे संकट कमी होताना दिसून येत नाही. दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागलीय. अकरा महिन्यात 249 शेतकर्यांनी कर्जबाजारी, नापिकी व इतर कारणांना कंटाळून आपले जीवन संपवले.
मराठवाडा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. येथील शेतकर्यांना शेती परवडत नाही. त्यातच निसर्गाचा लहरीपणा सातत्याने पहावयास मिळतो. यावर्षी खरीपाचे पीक चांगले आले होते, परंतु परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. अतिरिक्त पावसामुळे कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांना जबरदस्त फटका बसला. शेतकर्यांची पूर्ण मदार खरीप पिकावर असते. खरीप पीक हातचं गेल्यानंतर शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडत असतो. शेतीतून योग्य उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी नैराश्येत जाऊन स्वत:चं जीवन संपवत आहे. चालू वर्षाच्या अकरा महिन्यात बीड जिल्ह्यातील 249 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे. कर्जमाफी आणि इतर सवलती या तुटपुंज्या ठरत आहेत. शेतकर्यांसाठी भरीव तरतूद केल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत.










