राज्य सरकारच्या दोन मंत्र्यांचा दौरा रद्द; राज्यभरात शिंदे सरकारविरुद्ध संताप
मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न वाद विकोपाला जात असून कन्नडीगांकडून महाराष्ट्राला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न होत आहे. आज बेळगाव-हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर कन्नड रक्षणवेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अंधाधूंद दगडफेक केल्याने संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई, उदय सामत यांनी कन्नड दौरा रद्द केल्याने राज्य सरकारच्या धारेणाविरुद्ध महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत असून माघार कसली घेता? पवारांनी कर्नाटकात पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला खडेबोल सुनावले तर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी जशास तसे उत्तर द्या, असे म्हणत सरकारच्या धोरणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. इकडे शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी भाजपाला राज्या सरकार चालवण्याचा अधिकार नसल्याचे सांगत हे मिंदे सरकार नपुंसकतेप्रमाणे सरकार चालवत आहेत. महाराष्ट्र भाजपाची अवस्था ‘दिल्लीपुढेही गुडघे टेकीतो महाराष्ट्र माझा’, अशी जळजळीत टिका केली आहे.
कर्नाटकला जशास तसे उत्तर द्या -अजित पवार
कर्नाटक सरकारच्या अरे ला, का रे ने उत्तर द्या. बोम्मईंना जशास तसे उत्तर द्यावे, असे आवाहन मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. तसेच मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौर्याची पुढील तारीख जाहीर करावी, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
शिंदे सरकारचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आजचा कर्नाटक दौरा रद्द केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकार नमती भूमिका घेत असल्याचा आरोप होतोय.
देसाईंनी तारीख सांगावी..
अजित पवार यांनी कर्नाटक दौर्यावरून शिंदे सरकारला चांगलेच घेरले. ते म्हणाले की, आपल्या मंत्र्यांना बेळगावात प्रवेश न मिळणे, हे सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी जशास तसे उत्तर द्यावे. शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौर्याची पुढील तारीख सांगावी. महापरिनिर्वाण दिन म्हणून दौरा रद्द केल्याचे सांगता. मात्र, तुम्हाला सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असतो, हे माहित नव्हते का, असा सवालही त्यांनी केला. तसेच सरकारकडून थातूर-मातूर उत्तरे देणे सुरू असल्याचेही ते म्हणाले.