जिल्हा रुग्णालयात
मुलीवर उपचार सुरू
मुलीचा जबाब घेण्यासाठी तलवाडा पोलीस
रुग्णालयाकडे रवाना
बीड (रिपोर्टर) तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या, असे म्हणून एक तरुणाने मुलीच्या घरी जावून रात्री साडे आठ वाजता धिंगाणा घातल्याची घटना घडली. त्यानंतर मुलीला विष पाजल्याची घटना घडल्याची माहिती रिपोर्टरला समजल्यानंतर रिपोर्टरने जिल्हा रुग्णालयात जावून संबंधित मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिला समाधानकारक उत्तर देता आले नाहीत. तिची प्रकृती आता ठिक असल्याचे दिसून आले. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी जवाब घेतलेला नव्हता.
गेवराई तालुक्यातील काजळवाडी येथील इयत्ता दहावीत शिकणार्या मुलीला प्रियकराने विष पाजल्याची माहिती रिपोर्टरकडे आल्यानंतर रिपोर्टरने जिल्हा रुग्णालयात जावून मुलीसह नातेवाईकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा संबंधित मुलीच्या चुलतीच्या भावाचा मुलगा आणि या मुलीमध्ये भ्रमणध्वनीवरून सातत्याने संवाद असायचा. रात्री सदरचा मुलगा हा काजळवाडी येथील मुलीच्या घरी आला. तोही याच गावातला आहे. त्याठिकाणी येऊन तिच्या आई-वडिलांना ‘तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या’, असे म्हटल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी शिक्षणाचे कारण देत नकार दिला. त्यानंतर सदरील मुलाने मुलीला विष पाजल्याची चर्चा सुरू झाली असता मुलीला उपचारार्थ बीडच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. संबंधित मुलीला रिपोर्टरने विचारले असता तिला समाधानकारक उत्तर देता आले नाही.