बीड : ऑनलाईन रिपोर्टर
भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात गंभीर आरोपांचा सामना करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना शासनाने निलंबित केले आहे. याबाबतचा आदेश अप्पर आयुक्त (महसूल) कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून जारी करण्यात आला आहे.
शासन आदेश क्रमांक IAS-1026/C.R.23/IAS-2 दिनांक २० मे २०२६ नुसार, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५४४/२०२५ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना ७ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १५ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
शासनाच्या आदेशानुसार, अटकेच्या दिवसापासून म्हणजेच ७ मे २०२६ पासूनच अविनाश पाठक यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. संबंधित आदेश त्यांच्यावर बजावून दिनांकित पोचपावती शासनास सादर करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई अप्पर आयुक्त (महसूल) कार्यालयातील रीता म्हेत्रे यांनी आदेशाद्वारे केली आहे. दरम्यान, भूसंपादन मावेजा घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांच्या शासन निधीची फसवणूक झाल्याचा आरोप अविनाश पाठक यांच्यावर असून, या प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील चौकशीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










