मयत शीतलचा भाऊ, नवरा, सासू पोलिसांच्या ताब्यात, पोलीस घटनास्थळावर जाणार
बीड (रिपोर्टर) स्त्रीभ्रूण हत्येने कुप्रसिद्ध झालेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाल्याने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याइरादे आरोग्य प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या हालचालींनी वेग घेतला असून मयत महिलेच्या नवरा, भाऊ आणि सासूसह अन्य एका महिलेस पोलिसांनी ताब्यात सुंदरीचा प्रसाद दिला असता नवरा आणि भावाने या प्रकरणातील घटनेचं सत्य समोर मांडल्याचे विश्वसनीय वृत्त असून गर्भपात कुठे केला, ते घटनास्थळ दाखवण्यासाठी तयार झाल्याची माहिती समोर येत आहे तर लिंग निदान कुठे केले? त्या डॉक्टराची माहिती देण्यात आली असून घरी गर्भपात करताना कोण डॉक्टर, नर्स होते याचीही माहिती प्रशासनाला देण्यात आल्याने अवैध गर्भपात आणि लिंगनिदान करणार्या टोळीत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, गेल्या दोन दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील बकरवाडी येथील शीतल गणेश गाडे या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातले काही लालची डॉक्टर लिंगनिदान आणि गर्भपाताचा धंदा करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने घेऊन या प्रकरणातला शोध सुरू झाला. आज सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी मयत शीतल, तिचा नवरा, भाऊ, सासू आणि अन्य एका महिलेस ताब्यात घेत चौकशी केली. चौकशी दरम्यान पुरुषांना सुंदरीचा प्रसादही दिला. त्यानंतर नवरा आणि भावाने या प्रकरणातले सत्य पोलिसांसमोर मांडले. लिंगनिदान कुठे केले? कुठल्या डॉक्टरने केले? याची माहिती दिली. गर्भपात नेमका कुठे केला? तो करताना कुणी डॉक्टर सोबत होता का? नर्स सोबत होती का? या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी पटापट दिले. दुपारी एकच्या नंतर गर्भपात ज्याठिकाणी झाला ते घटनास्थळ दाखवण्यासाठी हे लोक तयार झाले असून पोलीस घटनास्थळी पाच वाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा तेजीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसात दोषींवर गुन्हा दाखल होणार आहे.
लिंगनिदान कोणी केले?
रिपोर्टरला मिळालेल्या माहितीनुसार लिंगनिदान कुठे केले? याची माहिती संबंधितांनी पोलीस प्रशासनासह आरोग्य विभागाला दिली आहे. रिपोर्टरलाही याची माहिती घटना घडल्यानंतर मिळाली होती. लिंगनिदान हे गेवराई शहरात झाले असून महिला डॉक्टराने लिंगनिदान केल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. विशेष म्हणजे लिंगनिदान करणारी डॉक्टर महिला यापुर्वीही या प्रकरणातच आतमध्ये जावून आली आहे.
महिलेच्या प्रकृतीची परिस्थिती कशी…
सदरील महिलेस तीन मुली आहेत. या तिन्ही बाळांतपण नॉर्मल न होता सिझरने झाले आहे. रिपोर्टरच्या सुत्राच्या माहितीनुसार या अगोदरही या महिलेचे नैसर्गक अबॉर्शन झाले आहे. आता त्या महिलेची ज्या डॉक्टराकडे ट्रिटमेंट चालू होती त्या डॉक्टरांनी स्पष्टपणे महिलेच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. अशी माहिती रिपोर्टरला मिळाली आहे. मात्र त्यानंतर लिंगनिदान आणि अबॉर्शनचा निर्णय कुटुंबियांनी घेतल्याचे कळते.
जिल्हा रुग्णालयाने अबॉर्शन केलं
असतं तर महिला वाचली असती
रिपोर्टरला मिळालेल्या माहितीनुसार शीतल गाडे ही महिला 3 जून रोजी गर्भपात करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आली होती. तिच्या सर्व टेस्ट करण्यात आल्यानंतर दुसर्या दिवशी 4 जूनला गर्भपात करू, असे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले होते. 4 तारखेला ही महिला पुन्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आली होती. मात्र जिल्हा रुग्णालयातून तिला हुसकावून लावण्यात आलं. त्यात त्यांनी घरी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. यात त्या महिलेचा जीव गेला.