Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा मंत्र जपा

अग्रलेख- ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा मंत्र जपा


गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यातल्या नेतृत्वाचे नेमके काम काय? या प्रश्‍नाचं उत्तर शिवराज्याभिषेक दिनी देशातल्या आणि राज्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या त्या भागातील नेतृत्वांनी नाही दिले तरी चालेल, परंतु या प्रश्‍नाचं उत्तर स्वत: शोधून आत्मचिंतीत होत स्वत:लाच दिलं तर ते अधिक बरं होईल. शिवराज्याभिषेक दिनी हा प्रश्‍न विचारण्याचं कारणच तेच. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत आल्यानंतरही सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारभार का आठवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत रयतेचे राज्य निर्माण करून या हिंदुस्तानात सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवून दिले. हे स्वातंत्र्य स्वत:च्या सत्तेसाठी नव्हते तर रयतेच्या पोटासाठी होते. हे सर्वश्रूत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आणि नेतृत्वानी तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीचा वारसा अंगीकारलाय का? नाही ना, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणं, मते मागणं, सत्ताकारणाचं गणित जुळवणं हे नाहीच जमलं तर जातीय तेढ निर्माण करत आसुरी आनंद घेणं आतातरी बंद करावं. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभाराची आठवण येते तेव्हा
मध्ययुगीन काळ
आठवतो. आज लोकशाहीच्या राज्यात लोकांना आपलं नेतृत्व निवडता येतं. मात्र मध्ययुगीन काळात ती परिस्थिती नव्हती. क्षुद्रादी क्षुद्रांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, नेतृत्व करणे ही कल्पना करणं सुद्धा अवघड होतं. कष्टकरी, श्रमिक, शेतकरी, पुर्वाश्रमीचे अस्पृश्य जातींना केवळ कष्ट करायचे, लढायचे आणि मरायचे एवढेच काम होते. कोणीही नेतृत्वाचा विचार करायचा नाही. कुणीही लिखान करायचं नाही, वाचन करायचं नाही. तो त्यांचा अधिकार नाही, असा दंडकच तेव्हाच्या धर्म मार्तंडांचा होता. एकीकडे जुल्मी राजवटीची दहशत होती तर दुसरीकडे धार्मिक दहशतवाद फोफावण्यात येत होता. अशा भयानक परिस्थितीमध्ये राजा बनणे किंवा राज्याभिषेक करून घेणे हे मोठे अवघड काम होते. परंतु जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने तेव्हाचा धार्मिक दहशतवाद मोडून काढणे इरादे बंड केला आणि ‘वेदाचा अर्थ आम्हाशी ठावा, इतरांनी वाहवा भार माथा ’ म्हणत कवित्व केलं. त्याप्रमाणेच शिवछत्रपती शिवाजी महाराजांनीही रायगडावर राज्याभिषेक करून एक क्रांतीकारी, ऐतिहासिक प्रेरणादायी निर्णय तर घेतलाच परंतु या निर्णयाने अथवा राज्याभिषेकाने दबलेल्या नाउमेद झालेल्या, पिचलेल्या, हताश मराठा बांधवांना (मराठा शब्द जातीवाचक नाही, सर्वसमावेशक) नवचैतन्य देणारा ठरला. महाराष्ट्राच्या आजुबाजुला मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, इंग्रज, डच या सर्वांचा अदब होता. अशा वेळी धर्म मार्तंडांची, धार्मिक दहशतवादांची जी कडाई होती आणि त्या कडाईत स्वार्थाच्या तप्त तेलात बहुजनांची जी लहाई होती तीच लहाई उमजून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका निर्णय घेतला आणि राज्याभिषेक करून रयतेचा राजा छत्रपती बनण्याचा बहुमान मिळविला. शिवाजी महाराज राजे झाले, छत्रपती झाले. ते सत्ताकारणासाठी नव्हे तर


सर्वास पोटास लावणे आहे
हा प्रांजळ हेतु समोर ठेवून. गुलामगिरीचे साखळ दंड तोडून टाकून स्वातंत्र्याचा श्‍वास महाराष्ट्राच्या मातीला आणि हिंदुस्तानाच्या हिमालयाला मिळवून देण्यासाठी हा राज्याभिषेक म्हणता येईल. मध्ययुगीन काळात राजकारभार असेल, पत्रव्यवहार असेल, तह, करार, न्यायदान, चलन व्यवस्था, कृषी कायदे, कर प्रणाली, दळणवळण, संरक्षण यासह अन्य बाबींसाठी इत्यादी कार्य करण्यासाठी राज्याभिषेक हा महत्वाचा होता. जोपर्यंत राज्याभिषेक छत्रपती शिवरायांचा झालेला नव्हता तोपर्यंत शिवराय देखील सरदार पुत्र, जमीनदार – वतनदारच होते. जसे महाराज होते तसे अनेक सरदारही होते. परंतु ते सत्तेचे मांडलिक होते. दिल्लीश्वराला मुजरे घालणारे आणि आपल्याच रयतेवर अत्याचार करणारे लोक होते. इथेच शिवछत्रपतींना स्वत:च्या राज्यातील प्रत्येक रयतेच्या छातीत स्वाभिमान आणायचा होता आणि त्या स्वाभिमानातून अखंड हिंदुस्तान स्वतंत्र करायचे होते. या सर्व घनाक्रमामुळे हा राज्याभिषेक झाला. परंतु या राज्याभिषेकाला तथाकथीत धर्म मार्तंडांकडून जो विरोध झाला, कर्तबगार राजाची त्याकाळी जी अवहेलना झाली ती शब्दात मांडणे कठीण आहे. परंतु कोण विरोध करतय यापेक्षा स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे. रयतेला न्याय देणं किती आवश्यक आहे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शिवछत्रपतींनी छत्र धरणारा राजा होणे पसंत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र महाराष्ट्रात कुठल्या राजाचं राज्य नव्हतं तर रयतेचं राज्य होतं. त्यांचा राजकारभार पारदर्शक होता, शिवछत्रपतींच्या कार्यकाळात गुन्हेगारांना शिक्षा होती, भ्रष्टाचार्‍यांना आणि गद्दारांना कडेलोट होता. सर्वसामान्यांना न्यायदान होते. दिन-दलित-दुबळे-वंचित, आर्थिकदृष्टया पिचलेल्यांना धान्य कोठार मोकळे करून दिले जात होते. पेरणीला बीभरण नसेल, बैल बारदाना नसेल तर तो स्वराज्यातून दिला जात होता. शिवछत्रपतींच्या राज्य कारभारातल्या कार्यप्रणालीची नखभर तरी सर आज राज्य करणार्‍या केंद्र आणि राज्यातल्या सरकारला येईल काय? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य रयतेचं राज्य या महाराष्ट्रात पुन्हा कुणी आणील काय? असे न साकार होणारे स्वप्न आणि प्रश्‍न अनेकांना पडत असले तरी ते स्वप्न पुर्ण होतीलच अथवा प्रश्‍न सुटतीलच हे सांगणे कठीण. जे राज्य बहुजनांचं राज्य म्हणून ओळखलं जातं, ज्या राज्यात बारा बलुतेदारांना एकाच रांगेत आणि एकाच तराजूत मोजलं जात होतं, त्या राज्यात आज


जातीचा रंग
का दिला जातोय? जात-पात-धर्म-पंथ याचा ज्याने त्याने प्रत्येकाने सन्मान करणं, स्वत:च्या जातीविषयी, धर्माविषयी गर्व बाळगावं परंतु दुसर्‍याच्या धर्माविरुद्ध जातीविरुद्ध अपशब्द काढू नये, ही शिकवण शिवबा राजांची होती. मग आज महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्या नेतृत्वांनी जातीचे आधार घेत राजकारण करणं का सुरू ठेवलं. केवळ सत्ता केंद्रांना केंद्रबिंदू ठरवून राजकारण करणार्‍या सर्वच पक्षातील नेतृत्वांनी ज्या पद्धतीने अखंड महाराष्ट्राचं विकेंद्रीकरण करत जात-पात-धर्म – पंथाला तेढात आणून सोडलं, हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. खरं पाहिलं तर शिवराज्याभिषेक दिनी अखंड महाराष्ट्रातील आणि देशातील नेतृत्व करू पाहणार्‍यांनी शिवछत्रपतींचा एकच मंत्र अंगीकारावा, तो म्हणजे सर्वास पोटास लावणे आहे आणि त्याच ध्येय-धोरणावर राजकारभार करण्यासाठी प्रयत्न करावा. तेव्हा आणि तेव्हाच कुठे या राज्यात समतेचे राज्य येईल आणि तेव्हा तुम्हा-आम्हांना शिवबांचे मावळे म्हणून संबोधून घेता येईल. सध्या मराठा आरक्षणाच्या विषयावरून महाराष्ट्रात रणकंद आहे. लोकशाहीच्या या देशात आरक्षण हा पिचलेल्यांचा अविभाज्य घटक आहे. ज्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं. तेच आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महाराष्ट्रातील ७० टक्के मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत द्यावं हे गेल्या ३५ वर्षांपासूनची मागणी गेल्या काही सालात पुर्णत्वास गेली. राज्य सरकारने मग ते कुठल्याही पक्षाचे असो भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण द्यावयास हवे होते मात्र तसे झाले नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी आणि फडणवीसांनी आरक्षण दिले मात्र ते न्यायालयात टिकले नाही. ते आरक्षण केवळ ठाकरे सरकारच्या गलथान कारभारामुळे टिकले नसल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मराठ्यांच्या आरक्षणावरून छत्रपतींचं नाव घेत चोहीबाजुने काहुर उठवलं जात आहे. प्रत्यक्षात पिचलेल्या मराठयांना पोटास लावण्या हेतु मराठा आरक्षण अत्यावश्यक आहे हे जेवढं त्रिवार सत्य आहे तेवढेच केवळ सत्ताकारणासाठी आणि मते घेण्यासाठी कायद्याची चौकट बलशाली न करता दिले गेलेले आरक्षण आणि त्याचे दोषी किंवा पापी अन् अभ्यास करून दिलेले आरक्षणाचे जनक म्हणावे लागतील. परंतु आता सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी, सत्ताधारी विरोधकांनी सर्वास पोटास लावणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंगीकारावा आणि या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!