उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेंच्या तोफा धडाडणार
बीड (रिपोर्टर) देशात भाजपाकडून खुणसी राजकारण केले जात आहे. भाजपाच्या या राजकारणाविरोधात आणि आघाडीची मूठ मजबूत करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महविकास आघाडीची पहिलीच जाहीर सभा होत आहे. ही जाहीर सभा होऊ नये म्हणून अनेक अडचणी आणल्या गेल्या मात्र जाहीर सभा लाखोंच्या संख्येने होत आहे. दुपारी पाच वाजता सभेला सुरुवात होत असल्याने सकाळपासूनच बीडसह मराठवाड्यातील हजारो कार्यकर्ते संभाजीनगरकडे रवाना होत असताना दिसून येत आहे. सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आदी नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. या सभेकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
महाआघाडीची सत्ता गेल्यानंतर भाजपाकडून खुणसी राजकारण केले जात आहे. महाआघाडीतील काही नेत्यांना जाणीवपुर्वक टार्गेट करण्याचे काम केले जाऊ लागले. विशेष करून शिवसेनेला जास्त प्रमाणात त्रास देण्याचे काम भाजपाच्या वतीने करण्यात आले. भाजपाच्या या हुकुमशाही राजकारणाचा विरोध करण्यासाठी आणि आघाडीची मुठ आणखी मजबूत करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दुपारी पाच वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली. ही सभा मराठवाडा सांस्कृतीक मैदान या ठिकाणी होत आहे. सभेची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. मध्यंतरी छत्रपती संभाजीनगरमधी काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थिती सभा होते की नाही, असे वाटत होते, मात्र सभा घेण्याचा निर्णय महाआघाडीच्या नेत्यांनी घेतला. ही सभा लाखोंच्या संख्येने होणार असल्याचे दिसून येत आहे. सकाळपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते संभाजीनगरकडे कुच होताना दिसून येत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते मार्गदर्शन करणार असून यात ठाकरे, पवार आणि पटोले काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.