Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाअजित दादा म्हणाले, कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन सतर्क, शेतकर्‍यांना कुठलीही अडचण...

अजित दादा म्हणाले, कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन सतर्क, शेतकर्‍यांना कुठलीही अडचण येऊ देणार नाही

जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्र्यांनी घेतला कोविडसह खरीप हंगामाचा आढावा
बीड (रिपोर्टर)- बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. इथला कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, सध्याची परिस्थिती काय, आणि सुदैवाने यावर्षी बीड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला, खरीप हंगामासाठी काही अडचणी आहेत का? कोरोना परिस्थितीत बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कुठल्याही अडचणींना सामोरे जाता यावे नाही या प्रमुख विषयांवर आढावा बैठक घेऊन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाला आणि कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे सांगून बीड जिल्ह्यातील पीक विमा पॅटर्न बाबत आपण अधिक माहिती घेऊन अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. त्यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी कोविड आणि कृषी बाबतचा संपुर्ण आढावा घेतला.


ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्या सोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. संजय दौंड, आ. बाळासाहेब आजबे या बैठकीला उपस्थित होते. गेल्या महिनाभरापूर्वी औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त आणि विभागातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत कोरोनाच्या विषयावर बैठक घेतली होती. त्यामुळे तुलनेने विभागात बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढलेली आहे. तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज बीड येथे खरीप हंगामाचा आढावा आणि सोबतच जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या याबाबत आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यात आले होते. पवार यांनी बीड जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची स्थिती काय आहे, लहान मुलांसाठी किती बेड तयार केले, वैद्यकीय मनुष्यबळ किती उपलब्ध आहे, संभाव्य तिसरी लाट आल्यानंतर मनुष्यबळासाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने बीड जिल्हा प्रशासनाला कोरोनाची तिसरी लाट आली तर काय मदत केली पाहिजे, याबाबतचाही आढावा आणि अडचणी समजून घेतल्या. मनुष्यबळासाठी कंत्राटी मनुष्यबळ किती लागेल, त्याची स्थिती स्वत: जाणून घेत आरोग्य विभागाला देत खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगाने खताची पुर्तता किती आहे, बियाणे शेतकर्‍यांना मिळाले का, जिल्ह्यामध्ये महाबीज, सोयाबीन बियाणे मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यामुळे महाबीजचे सोयाबीन बियाणे किती पुरवावे लागेल याचाही आढावा त्यांनी बैठकीत घेऊन मागेल त्याला पिक कर्ज तात्काळ करून द्या, अशाही सूचना जिल्हा प्रशासनासह बँकेच्या अधिकार्‍यांना अजित पवार यांनी दिल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरेंसह बँक आणि महसुल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसात शहर स्वच्छ करा
नसता घरी पाठवेल

उपमुख्यमंत्र्यांनी न.प.सीओंना खडसावले
बीड शहरात आल्यानंतर रस्त्याच्या डिव्हायडरच्या बाजुने मोठ्या प्रमाणात कचरा दिसून आला, नगरपालिका करते काय? तुम्ही काम करत नाहीत का? दोन दिवसात बीड शहर मला स्वच्छ दिसले पाहिजे, नसता थेट तुम्हाला घरी पाठवेल, असे म्हणत दोन दिवसात तुम्ही काय काम केले, नगरपालिका काय करते, याची माहिती मी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून घेईल. दोषी आढळलात तर थेट घरी, असे अजित पवार म्हणाले. नगरपालिकेचे सीओ डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना चांगलेच फाईलावर घेतले.

बीडच्या पीक विमा पॅटर्नबाबत लवकरच मंंत्रालयात बैठक
बीडच्या पीक विमा पॅटर्नबाबत देशाच्या पंतप्रधानांना थेट सादरीकरण करण्यात आलेले आहे. राज्यामध्ये कोल्हापूर, सातारा या भागातील तीन टक्केच शेतकरी पिक विमा भरतात. वास्तविक पाहता पीक विमा ही बाब ऐच्छिक आहे. बीडच्या शेतकर्‍यांनी जवळपास ८०० कोटींच्या पुढे पीक विम्याची रक्कम भरलेली आहे मात्र या पीक विम्यापोटी शेतकर्‍यांना २०० कोटीच्या आसपासच रक्कम मिळालेली आहे. यातून विमा कंपनीचा फायदाच होतो ही बाब जरी खरी असली तरी लवकरच मंत्रालयामध्ये बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंसह औरंगाबाद विभागातील जाणकार अधिकार्‍यांची बैठक घेऊन बीड विमा पॅटर्न राज्यात राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवारांनी सांगितले.

बैठकीत काय झालं, क्षणचित्र…
कोरोनाच्या टेस्ट वाढवा, दहा लाखामध्ये तीन लाख टेस्ट करा
प्रत्येक तालुक्यात १३ के.एल. क्षमतेचे एक लिक्वीड ऑक्सिजन टँक उभारा
बीड जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त जागा शंभर टक्के भरणार
तिसर्‍या लाटेची तयारी पुर्ण करा
खासगी दवाखान्यातील बिलाचं रोज ऑडीट झालं पाहिजे
ऑक्सिजन प्लँट एक महिन्यात पुर्ण करा
जिल्ह्यात मृत्यूची संख्या जास्त, ग्रामीण भागात जनजागृती करा
जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेट विभागात अव्वल;
तरीही शास्त्रशुद्ध कॉन्टॅक ट्रेसिंग वाढवा

लसीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्याला लस मिळतील
विना मास्क फिरणार्‍याला आता पाचशे रूपये दंड लावा
खरीप पीक कर्ज प्रकरणी डिसीसीला ३० जुन तर महाराष्ट्र
ग्रामीण बँकेला १५ जुलैपर्यंत उद्दिष्ट पुर्ण करण्याची तंबी

Most Popular

error: Content is protected !!