Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- जागतिकीकरण आणि आजची शिक्षणातील विषमता

प्रखर- जागतिकीकरण आणि आजची शिक्षणातील विषमता


शिक्षण हे एक असं माध्यम आहे ते माणसाला विचार करायला लावतं, माणसाच्या विकासात भर घालतं. शिक्षणाला पुर्वीपासून महत्व आहे. राजा,महाराजांचे मुलं विशीष्ट गुरुगुलमध्ये शिक्षण घेत होते. मात्र सर्वसामान्यांना पुर्वीपासून शिक्षण मिळालं नाही. स्वातंत्र्यापुर्वीचा इतिहास बघितला तर इंग्रज देशात आल्यानंतर इंग्रजांनी आधुनिकीकरण आणलं, तशी शिक्षणाची नवीन प्रणाली आणली. इंग्रजी शिक्षण हे इंग्रजामुळे देशात रुजलं. इंग्रजांनी आपल्या मुलासाठी देशात अनेक ठिकाणी इंग्रजी शाळा सुरु केल्या होत्या. भारतातीत गोर-गरीबांना शिक्षण मिळावे,यासाठी महात्मा ज्योतीबा फुले यांनी शाळा सुरु केल्या. फुले यांचे शिक्षणात मोठे योगदान आहे. शिक्षणामुळे कसे फायदे होतात आणि न शिकल्यानंतर कसं नुकसान होतं, याचं वास्तव फुले यांनी जनतेसमोर मांडले. फुलेंनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळांना त्या वेळच्या धर्ममार्तडांनी प्रचंड विरोध केला होता. हा विरोध डावलून फुलेंनी आपलं शैक्षणीक कार्य जोमाने सुरुच ठेवलं. त्यांनी शिक्षणात क्रांती केली. त्यानंतर छत्रपती शाहू, महाराज यांनी कोल्हापुरात शिक्षणाची गंगा आणली. प्रत्येक धर्मियांचे बोर्डीग सुरु करुन मुलांना शिक्षण दिलं. विशेष करुन त्यांनी सक्तीचं शिक्षण केलं होतं, जे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणार नाहीत. त्यांना दंडाची आकारणी केली होती. शिक्षणाला फुले, शाहु महाराज यांनी महत्व देवून देशात शिक्षण प्रणाली रुजवली आणि शिक्षण सर्वासाठी खुलं केलं. सर्वासाठी खुलं केलेलं शिक्षण आज आर्थिक कोंडीत सापडलं. जागतिकीकरणामुळे शिक्षणाचा बाजार झाला. या बाजारात स्पर्धा निर्माण झाल्या. जो स्पर्धेत पैसे देवून उतरेल तोच टिकू लागला. ज्यांच्याकडे पैसा नाही ते मात्र यातून बाहेर फेकले जावू लागले.


व्यापार झाला
१९९० पासून जगात प्रचंड बदल झाला. तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे जग जोडलं गेलं. शिक्षणातही बदल झाला. जागतिकीरणामुळे व्यापाराला चालना मिळाली. कोणत्या ही देशात कोणताही माणुस व्यापार करु शकतो. जसं व्यापारात खुलं करण करण्यात आलं. तसचं शिक्षणात खुलंकरण झाल्याने शिक्षण हे ठरावीक लोकांनी मक्तेदारी ठरु लागली. शाळा काढण्यास मान्यता देण्यात आल्याने पुढार्‍यांनी तिथं-तिथं शाळा सुरु करुन त्यातून आपलं राजकारण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सरकारने आपल्यावरील भार कमी करण्यासाठी शिक्षणातून अंग काढून घेण्यास सुरुवात केली. शिक्षणातल्या खाजगीकरणामुळे खाजगी शाळांचे पीक आले. खाजगी शाळा आणि सरकारी शाळा असा आर्थिक भेदभाव निर्माण होवू लागला. खाजगी लोकांनी शिक्षणात पैसा गुंतवण्यास सुरुवात केली. जितके पैसे गुंतवले त्यापेक्षा कित्येक पटीने ते शिक्षणातून पैसा कमावू लागले. शिक्षण हे एक पैसा कमवण्याचं साधन झालं. शाळेने किती फिस घ्यावी असं काही बंधन नाही. त्यामुळे खाजगी शाळा वाट्टेल तितक्या फीस आकारुन पालकांच्या खिशावर दरोडा टाकू लागले. खाजगी शाळात शिक्षण घेणं हा आज ‘उच्चपणा’समजला जावू लागला. ‘तुमचं मुल कुठं शिकतं तर आमक्या, आमक्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेतं’ असं पालक अभिमानाने सांगत असतात इतकी, इतकी आम्ही फीस भरतोत याचाही पालकांना अभिमान असतो. बड्या शाळात शिक्षण घेणारं प्रत्येक मुल यशस्वीच होतं असं काही नाही, पण आज जे काही खाजगी आणि बड्या शाळाचं पीक आलं आहे ते निव्वळ लुट करणारं आणि दिशाभुल करणारं आहे. प्राथमीक किंवा गावाकडच्या शाळात शिकणारे कित्येक मुलं यशस्वी होतातच ना, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात ते झेप घेत असतात. ज्यांची शाळा प्राथमिक आहे ते निव्वळ आडाणी राहतात असं काही नाही. खाजगीकरणामुळे शिक्षणात दरी निर्माण झाली. गरीब आणि श्रीमंत अशी भेदाची भिंत निर्माण करण्याचं काम जागतिकरणाने केलं आहे.


शासन जबाबदार
व्यापारासाठी खुलंकरण केलं हे ही काळानुसार योग्यच मानल जातं, पण ज्यातून समाज आणि देश घडतो. त्याचं बाजारीकरण करणं हे कितपत योग्य आहे? शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे असं शासन सागतं पण ते कसं मिळालं पाहिजे हे सांगत नाही. एक ही मुल शिक्षणापासून वंचीत राहू नये असं शैक्षणीक धोरण आहे. दरवर्षी देशात लाखो मुलं शाळाबाह्या असतात. त्या बाबत शासन काहीच करत नाही. फक्त घोषणा करायच्या, पांढरे कागदं काळे करायचे हेच सरकारचं धोरण आहे का? बालमजुरी करणं हा ही गुन्हा मानला जातो. बालमजुरी करण्याची वेळ मुलांवर का आली याचं आत्मचिंतन केलं जात नाही. मुलांची खुप इच्छा असते आपण ही शिकावे पण त्याला त्याची गरीबी सोडत नाही. पोटाची आग विझवण्यासाठी मजुरी करावे लागते. पोटात काही नसेल तर शाळात मन लागेल का? पुस्तकाचं आणि इतर खर्चाचं काय? अशा अनेक गोष्टीचा सामना बालमजुरांना करावा लागतो. लाखो बालकं देशातील अनेक ठिकाणी काम करतात त्याला त्यांची परस्थितीत काम करण्यास भाग पाडत आहे. अशा बालकांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या घरातील अठराविश्‍व दारिद्रय संपुष्टात आणण्यासांठी आपलं शासन काय करतय? गरीबी हाटाओचा नुसताच नारा द्यायचा, त्यातून लाोकांच्या टाळ्या मिळतात, पण प्रत्यक्षात गरीबी हाटली का? देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली. तरी देशातील लाखो कुटूंब गरीबीत जगतात आणि गरीबीतच मरत आहेत. ज्या प्रमाणे गरीब लोकांंचं आयुष्य असंच संपतं त्याच प्रमाणे त्यांच्या पुढच्या पिढ्याचं ही आयुष्य असंच संपू लागलं. घोषणा, वादे, निर्णय ह्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. त्यातून ठोस काही होतांना दिसत नाही.


काय अवस्था आहे शाळांची?
शिक्षणाची जबाबदारी शासन काढून घेत असल्याने शाळा सुधाराव्यात असं शासनाला मनातून वाटत नाही, आणि वाटलं असतं तर नक्कीच शाळांचं रुपडं पालटण्याचं काम शासनाने केलं असतं. जि.प.च्या प्राथमिक शाळात मुलांचा पाया मजबुत होत असतो. आज प्राथमिक शाळांची काय अवस्था आहे? राज्यातील कित्येक अशा शाळा आहेत, त्या धोकादायक बनल्या. मुलांना बसायला जागा नाही. शिक्षकांचा दुष्काळ असतो. काही शाळांत शिक्षक असले तरी सगळ्याच शिक्षकांची मानसीकता मुलांना चांगलं शिकवण्याची असते असं नाही. बोटावर मोजण्या इतकेच शिक्षक चांगले काम करतात. कामचुकार शिक्षक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. नौकरी लागली म्हणुन काही शिक्षक टोपले टाकण्याचं काम करतात. शासनाचं धोरणं चांगलं असतं तर शाळांवर चोवीस तास लक्ष दिलं असतं. मुळात शासनाचं शाळाकडे लक्ष नाही. जसं आहे तसं चालू द्या, कारण एकाही पुढार्‍याचं मुल जि.प. शाळात शिक्षण घेत नाही. जि.प. शाळातील शिक्षकांचेच मुलं जि.प. शाळात कधी शिकत नाहीत. त्यामुळे जि.प. शाळांना घरघर लागली. खेड्यातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आता नवीन शिक्षण धोरणानुसार मुलांची कमी संख्या असलेल्या जि.प. शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा मोठा तोटा होणार आहे. कमी मुलं असल्यामुळे ज्या काही शाळा बंद होतील, त्या पुन्हा सुरु होणार नाही. गाव, वस्तीवरील मुलं लांबच्या शाळेत जातील का? मुलींना पालक लांबच्या शाळेत पाठवण्यास तितका पुढाकार घेणार नाहीत. यामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढू शकते.


गरीबांना न पेलणारे शिक्षण
दीड वर्षापासून देशातील शाळांना कुलूप आहे. शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणपध्दत सुरु करण्यात आली. ऑनलाईनचा पुरता बोजवारा उडलेला आहे. ऑनलाईन पध्दतच ही पुर्णंता चुकीची ठरु लागली. कधी तरी अडचणीच्या काळात या पध्दतीचा वापर होवू शकतो. नियमीतपणे ऑनलाईनचा फायदा नाही तर तोटाच होत आहे हे कोरोनात दिसून येत आहे. कोरोनात फक्त २० टक्केच मुलांना ऑनलाईनचा फायदा झाल्याचे समोर आले. इतर विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा शालेय अभ्यासक्रम माहित झालेला नाही. शाळा बंद असल्यामुळे मुलांना शाळेचा विसरच पडू लागला. यात मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामीण भागात मोबाईलला रेंज नसते. काही ठिकाणी असली तरी प्रत्येक मुलांच्या पालकाकडे आधुनिक दर्जाचा मोबाईल असेल असं नाही. शिक्षण पध्दतीचं पुर्णता वाटोळा होवू लागलं. शिक्षण पध्दतीत बदल केले जात नाही. त्यामुळे शिक्षणातून गोरगरीबांचे मुलं हद्दपार होवू लागले. पहिली पासून ते उच्च शिक्षण हे मोफत असायला हवं. तशी तरतुद केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे. शिक्षणावर ६ टक्के खर्च केला पाहिजे असं कोठारी आयोगाने गेल्या काही वर्षापुर्वीच म्हटलेलं आहे. याची दखल अद्याप पर्यंत कोणत्याही सरकारने घेतली नाही. नको त्या ठिकाणी सरकार खर्च करतं, मात्र शिक्षणात खर्च करतांना हात आखडता घेतला जातो. जितके लोक शिक्षीत होतील, उच्च पदावर जातील तितका समाजाचा आणि देशाचा फायदा आहे. हा विचार का केला जात नाही. राजकारणात जसा प्रस्थापीतपणा निर्माण झाला तसचं शिक्षणात झालं आहे. डॉक्टराचा मुलगा डॉक्टरच होतो तो कधी रोजगार हमीवर कामाला गेल्याचं देशात कुठं उदाहरण पहावयास मिळत नाही. मजुराचा मुलगा मजुरीच करतो. हजारोतून एखाद्याच मजुराचा मुलगा कारकूर होतो. सगळ्याच मजुरांची मुल चांगले शिक्षण घेवून कुठं तरी चांगला जॉब करतांना दिसत नाही. याला कारण म्हणजे येथील शिक्षणातील आर्थिक विषमता आहे. उच्च शिक्षणासाठी मोठया प्रमाणात पैसे लागतात तितके पैसे गरीब मजुर, शेतकर्‍याकडे नसतात. त्यामुळे त्यांची मुलं इच्छा असूनही उच्च शिक्षण घेवून शकत नाही. आपले स्वप्न पुर्ण करु शकत नाहीत. शिक्षणात प्रचंड स्पर्धा सुरु झाली. त्या स्पर्धेत पैशावाल्यांचे मुलं पुढे जातांना दिसतात. सर्वसामान्यांची मुलं अशा स्पर्धेत दिसत ही नाहीत आणि टिकत ही नाहीत. जो पर्यंत शिक्षणात समानता निर्माण होत नाही तो पर्यंत आपला देश ज्ञानसम्राट होणं शक्यचं नाही. देशातील मुलात कौशल्य आणि काम करण्याची जिद्द आहे, पण त्यांना संधी मिळत नसल्याने ते मुलं पुढे जावू शकत नाहीत हे त्यांचे दुर्देव आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणातून फायद्याऐवजी तोटाच होत आहे याचा विचार आपलं सरकार करणार आहे की नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!