मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुटीची अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री असे सुटीवर जाण्याची पहिलीच वेळ असल्याचे समजते.
कधी पर्यंत सुटीवर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 ते 26 एप्रिल दरम्यान सुटीवर असल्याचे समजते. त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर आपण सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी जात असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांच्या गावी ते देवदेव करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची बोलून दाखवलेली उघड इच्छा, सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता. या साऱ्या घडामोडीत मुख्यमंत्री सुटीवर गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
सुटीचे पहिले कारण
सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल आपल्या बाजून लागावा, यासाठी एकनाथ शिंदे गावातल्या देवीला साकडे घालणार असल्याचे समजते. शिवाय राजकीय कोलाहलातून थोडी विश्रांती हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे.
सुटीचे दुसरे कारण
अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला, तर भाजप अजित पवारांना सोबत घेणार असल्याची चर्चाय. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे समजते. ते त्यांना उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी हा पर्याय निवडल्याचे समजते.
सुटीचे तिसरे कारण
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी राज्यपालांची भेट घेऊन दबाव वाढवला. यामुळेही एकनाथ शिंदे सुटीवर गेल्याचे समजते.