बीड (रिपोर्टर) बीड शहरातल्या किल्ला मैदान परिसरातील एका वास्तूबाबत सर्वत्र चर्चा होत असून त्या चर्चीत वास्तूमध्ये रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांनी घुसखोरी केली. उपस्थित लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र आज सकाळी पुन्हा त्या तरुणांनी सदरच्या वास्तूमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन्ही तरुण बीडमधील नसून कर्जत येथील असल्याचे सांगण्यात येते. त्या तरुणांचा सदरचा वास्तूमध्ये घुसखोरी करण्याचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत अधिक असे की, शहरातील किल्ला मैदान परिसरात एक पुरातन वास्तू आहे. त्यावर महालक्ष्मी मंदिर म्हणून नुकताच दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सदरची वास्तू ही चर्चेत आली असून सोशल मिडियासह अन्य माध्यमातून तिचे चित्र आणि व्हिडिओ राज्यभर पसरले आहेत. सदरच्या वास्तूमध्ये जाण्यास पोलिसांनी सर्वसामान्यांना मज्जाव केला आहे अशा स्थितीत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मगर आणि रणदिवे नामक दोन तरुणांनी घुसखोरी केली. या वेळी काही लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यावेळी सोशल मिडियावर व्हिडिओ पाहून आम्ही या ठिकाणी आलो, फोटो आणि व्हिडिओ काढायचे होते, असे उत्तर तरुणांनी पोलिसांना दिले. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले मात्र आज सकाळी पुन्हा ते दोन तरुण सदरील वास्तूच्या परिसरामध्ये दिसून आले. त्यामुळे त्यांना बीड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून कर्जतवरून बीडमध्ये येण्याचे कारण काय? वास्तू परिसरात ते का फिरत होते? यासह अन्य बाबींचा तपास पोलीस करत आहेत.