बीड, (रिपोर्टर):- शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न समजुन घेण्यासाठी राज्यात महाप्रबोधन यात्रा काढण्यात आलेली आहे. या महाप्रबोधन यात्रेची येत्या 20 तारखेला बीड येथे शेवटची सभा होत असून या सभेला शिवसेना नेते खा. संजय राऊत, उपनेत्या सुषमाताई अंधारे, माजी मंत्री चंद्रकांत खैरे उपस्थित राहणार असून या सभेसाठी जिल्हाभरातून किमान 10 हजार लोक उपस्थित राहतील, शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी ही यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असून जनसामान्यातून मोठ्या संख्येने या यात्रेबद्दल उत्सुक आहेत असे प्रतिपादन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले.
येत्या 20 तारखेला बीड येथे महाप्रबोधन यात्रा होत असून त्याअनुषंगाने शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख धोंडुतात्या पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी अनिल जगताप बोलत होते. या पत्रकार परिषदेला माजी आमदार सुनिल दादा धांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, माजी मंत्री बदामराव पंडीत, जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, युवा सेना प्रमुख सागर बहीर, नितीन धांडे, सुनिल सुरवसे, गणेश वरेकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सत्तासंघर्षानंतर बीड येथे शिवसेनेची महाप्रबोधन यात्रेनिमित्त पहिली सभा होत आहे. या सभेसाठी बीड येथे पहिल्यांदाच शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित राहणार असून शिवसेनेच्या अभ्यासू वक्त्या तथा उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा बीड हा जिल्हा आहे त्यामुळे ही सभा भव्य-दिव्य होण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत. सभेपुर्वी माजी आ. सुनिल दादा धांडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भव्य-दिव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे. या सभेला नागरिकांनी येण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जात नाही तर सत्ता संघर्षानंतर बीड येथे पहिल्यांदाच महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभा होत असल्यामुळे नागरिकातच सभेबद्दल उत्सुकता असल्यामुळे सभा मोठी होणार आहे असेही अनिलदादा जगताप यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला संपर्क प्रमुख धोंडुतात्या पाटील, बदामराव पंडीत, सुनिल दादा धांडे, अप्पासाहेब जाधव यांनीही थोडक्यात संबोधित केले.