पगार न देताच कंपनीचा मालक झाला फरार; कामगारांची बीड पोलीसाकडे धाव
बीड(रिपोर्टर): पीडब्ल्यूडी या कंपनीकडून राज्यभरात वाहनांचा सर्वे केला जातो. सदरील कामगार सर्वे करून बीड येथे आले असता कामगारांचा पगार न देता कंपनीचा मालक फरार झाला असून या बाबत कामगारांनी बीड पोलीसांकडे तक्रार दाखल केली मात्र शिवाजीनगर पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. हे कामगार जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर काहीवेळ थांबलेले होते.
राज्यभरातील वाहनांचा हायवे रस्त्यावर थांबून पीडब्ल्यूडी या संस्थेकडून सर्वे केला जात आहे. आतापर्यंत विविध जिल्ह्यामध्ये या कंपनीने कामगारांच्या माध्यमातून सर्वे करून घेतला. पंढरपूर नंतर बीड येथे सर्वे करण्यात येणार होते. हे कामगार बीड येथे सर्वे करण्यासाठी आलेले होते मात्र कंपनीचा मालक पुणीत कुमार हा कामगारांचे पैसे न देता फरार झाल्याने कामगार अडचणीत सापडले. त्यांना जेवण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याने कामगार मालकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलीसात गेले होते मात्र शिवाजीनगर पोलीसांनी दुपारपर्यंत त्यांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती.