बीड(रिपोर्टर): एसटी महामंडळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने आज सकाळपासून बीड बसस्थानकातील बससेवा काही काळासाठी पुर्णत: ठप्प झाली होती. ऑनलाईन तिकीट सेवा असल्याने प्रवाशांना तिकीट देता येत नव्हते. 11 ते 11:30 वाजेपर्यंत बीड बसस्थानकात व्यवस्थेचा गोंधळ सुरू असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अखेर जुन्या तिकीट सेवेने काही गाड्या सुरू करण्यात आल्या. बीड बसस्थानक प्रशासनाशी रिपोर्टरने संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकारी आणि खालच्या अधिकार्यात ताळमेळ नसल्याचेही जानवले. काहीजण 20 ते 30 टक्के बससेवा बंद असल्याचे सांगत होते तर काहीजण 50 टक्क्यापेक्षा बससेवा बंद असल्याचे सांगत होते.
बीड बसस्थानकात सातत्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्यापासून ते पाकीटमारांपर्यंत प्रवाशी सातत्याने त्रस्त असतात. बीड बसस्थानक प्रशासन प्रवाशांच्या सोईसाठी ठोस पाऊले उचलताना दिसून येत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाचे सर्व्हर रात्रीपासून बंद आहे. आज सकाळी बससेवा पुर्णत: ठप्प झालेली होती. ग्रामीण भागासह जिल्हाबाहेर जाणार्या बस केवळ ऑनलाईन तिकीटसेवा असल्याने आणि सर्व्हर बंद असल्यामुळे तिकीट देता येत नव्हते म्हणून बंद ठेवण्यात आली होती. 11.30 च्या सुमारास काही गाड्या बीड बसस्थानकातून सोडण्यात आल्या. ज्या वाहकांना जुन्या पद्धतीने तिकीट देता येते त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली मात्र बहुतांशी वाहक हे नवीन कर्मचारी असल्याने दिसून येते, त्यांना जुन्या पद्धतीने तिकीट देता येत नसल्याचे तेथील काहींचे म्हणणे होते. या सर्व गोंधळामध्ये प्रवाशांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
रात्री अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने सर्वांचीच धावपळ उडाली, अनेक गाड्यांच्या फेर्या रद्द कराव्या लागल्या तर काही गाड्या लेट झाल्या. त्यानंतर मॅन्युअल ट्रेद्वारे तिकिटाची सोय केल्यानंतर गाड्या सुरू झाल्या आहेत. सर्व्हर सुरळीत झाल्यावरच पुर्ण गाड्या सुरळीत होतील
–जे.जे.शेख
वाहतूक नियंत्रक