Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमराठवाड्यातील ऐंशी टक्के शेती उद्ध्वस्त -सुनिल केंद्रेकर

मराठवाड्यातील ऐंशी टक्के शेती उद्ध्वस्त -सुनिल केंद्रेकर


नांदूर हवेली, आहेर वाहेगाव, माळापुरी, कुर्ला, निमगाव, ईरगावातील नुकसानीची केली पाहणी
सर्व खातेप्रमुख, अधिकार्‍यांची दुपारी घेणार जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
बीड (रिपोर्टर)- मराठवाड्यातल्या शेतीला मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर डॅमेज केले आहे. बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त शेतातील पिके पाण्यामुळे उद्ध्वस्त झाल्याचे आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी म्हटले.

244616093 553514765886248 3921465255691164787 n


ते आज बीड जिल्ह्यात शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. रिपोर्टरशी बोलताना आयुक्त सुनिल केंद्रेकर म्हणाले की, मध्यंतरी जो पाऊस झाला तो मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मुसळधार पावसाने शेतीला मोठ्या प्रमाणावर डॅमेज केले. मराठवाड्यात अनेक ठिकाणी शेतीची पाहणी केल्यानंतर हे स्पष्टपणे जाणवते. ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले. आज बीड जिल्ह्यातही अनेक शेतकर्‍यांच्या शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी करत आहोत. अनेक शेतातले पिके वाहून गेले आहेत. काही शेतात आजही पाणी दिसत आहे. त्यामुळे कापूस अथवा अन्य पिके लाल पडत आहे, करपलेले दिसून येत आहेत. शेतातील पिकांचे योग्य पंचनामे होतील, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍याला मोठी मदत होईल. सोबतच बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत. काहींच्या शेळ्या, मेंढ्याही मृत्युमुखी पडले आहेत. याचाही सविस्तर अहवाल या पाहणी दौर्‍यात अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांनी घ्यावा आणि तो प्रशासनाला सादर करावा, असेही केंद्रेकर यांनी या वेळी अधिकार्‍यांना सूचीत केले.

244616093 553514765886248 3921465255691164787 n 1


गेवराई आणि बीड तालुक्यातील नांदूर हवेली, आहेर वाहेगाव, माळापुरी, कुर्ला, निमगाव, ईरगाव या गावातील वाहून गेलेले रस्ते, बंधारे यांचीही पाहणी या वेळी आयुक्त केंद्रेकर यांनी केली. या वेळी बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना त्यांनी काही सूचनाही केल्या. या पाहणी दौर्‍यानंतर एकूण नुकसान झालेल्या शेतीचा आणि रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी खातेप्रमुखांची बैठक घेणार असल्याचेही केंद्रेकर यांनी रिपोर्टरला बोलताना सांगितले. या वेळी आयुक्त केंद्रेकर यांच्या सोबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, गेवराई, माजलगाव, बीड येथील तहसीलदार सोबत होते.

Most Popular

error: Content is protected !!