Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रतब्बल दोन वर्षांनंतर वारकरी-विठूरायाची भेट उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा

तब्बल दोन वर्षांनंतर वारकरी-विठूरायाची भेट उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा


पंढरपूर (रिपोर्टर):- आज कार्तिकी एकादशी असून तब्बल दोन वर्षांनंतर वारकर्‍यांना आपल्या लाडक्या विठू माऊलीचे दर्शन घेता येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनंतर पंढरपूरमध्ये विठुरायाचा जयघोष केला जात आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. पहाटे तीनच्या समुरास ही महापूजा पार पडली. त्यानंतर श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशीला वारकर्‍यांना विठुरायाचे दर्शन घेता आले नव्हते. पण यावेळी कार्तिकी एकादशीला विठ्ठूरायाचे दर्शन मिळणार असल्याने वारकर्‍यांची पावले पंढरपूरच्या दिशेने वळाली आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे. वारकर्‍यांनी लाडक्या विठ्ठूरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. यावर्षी विठुरायाची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील वारकरी कोंडीबा देवराव टोणगे आणि पर्‍यागबाई कोंडीबा टोणगे या दाम्पत्यांना मिळाला आहे. हे पती-पत्नी गेल्या तीस वर्षांपासून विठुरायाची यात्रा करत आहेत.
महापूजेनंतर मंदिर समितीने घेतलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी असे सांगितले की, ‘राज्यात सुख शांती नांदावी, वारीची परंपरा कायम सुरु राहावी यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातले. तसंच, सध्या चायना, रशिया आणि युरोपमध्ये कोरोनाने तोंडावर काढले आहे. आरोग्य विभागाच्या सुचनेनेच नागरिकांनी कोरोनाबाबत उपचार घ्यावेत. कोरोना संपला नाही. प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देखील घ्यावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनामुळे आषाढी वारीवर सरकारने निर्बंध लादले होते. त्यामुळे वारकर्‍यांना पंढरपूरात जाता आले नव्हते. पण आता कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकार्‍यांनी सशर्त परवानगी दिली आहे. नियम आणि अटींचे पालन करुन ही यात्रा पार पडत आहे. कार्तिकी वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. या दरम्यान पाच ते सहा लाख भाविक विठुरायाचे दर्शन घेतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!