Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडपद सांभाळता आलं नाही

पद सांभाळता आलं नाही


मजीद शेख
बीड- शिवसेनेचा जिल्हाप्रमुख मिनी आमदारच समजला जातो. इतकं महत्व शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला आहे. बीड जिल्हयात शिवसेनेचा विस्तार नसला तरी बीड तालुक्यात शिवसेनेला पुर्वीपासून पोषक वातावरण राहिलेलं आहे. शिवसेनेच्या तिकीटावर बीड मतदार संघातून आता पर्यंत दोनदा प्रा. नवले, एकदा प्रा. धांडे निवडून आले. पुर्वी शिवसेनेचा एक जिल्हाप्रमुख असायचा, आता दोन जिल्हा प्रमुख नियुक्ती केले जातात. जिल्हयात पक्ष वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी बीड जिल्हयात शिवसेना पदाधिकार्‍याच्या निवडी करण्यात आल्या. पुर्वीच्या जिल्हाप्रमुखांना कमी करुन त्या ऐवजी नवीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली. या नव्या जिल्हाप्रमुखांकडून पक्षाने संघटन वाढीच्या मोठया अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. अपेक्षेनूसार पक्षाची वाटचाल तर झाली नाही, उलट जिल्हाप्रमुखांच्या कारणामांची बीड ते मातोश्रीपर्यंत चर्चा होवू लागल्या. त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. या दोघांना आपला कार्यकाळ पुर्ण करता आला नाही. दोन वर्षातच त्यांच्या पदावर गंडांतर आलं.


बीड जिल्हयात ऐंशी,नव्वदच्या दशकात शिवसेनेचं वारं आलं. शिवसेनेशी तरुण जोडले जात होते. जिल्हयात शिवसेना तितकी पॉवरफुल नसली तरी बीड मतदार संघात शिवसेनेला पुर्वीपासूनच पोषक वातावरण होतं. प्रा. सुरेश नवले यांच्या रुपाने बीड मध्ये शिवसेनेला पहिला आमदार मिळाला. नवले हे दोनदा निवडून आले. नवले यांनी शिवसेनेचा चांगला विस्तार केला होता. त्यांच्या काळात शिवसेना म्हणजे एक दराराच होता. नवले नंतर प्रा. सुनील धांडे यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व आलं. धांडे यांची कारर्कीद चांगली राहिली. बीडच्या जनतेने धांडे यांना एकदा निवडून दिलं. अनेक वर्ष त्यांच्याकडे शिवसेनेचं जिल्हाप्रमुख पद होतं. धांडे यांच्यानंतर बीड शिवसेनेत बदल झाले. अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. पक्ष वाढीसाठी शिवसेनेने दोन जिल्हाप्रमुखांची निवड केली. जवळपास दहा वर्ष जगताप, पिंगळे हे जिल्हाप्रमुख होते. विधानसभेच्या पुर्वी त्यांच्या जागी कुंडलीक खांडे, सचिन मुळूक या दोन तरुणांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली, हे दोन्ही जिल्हाप्रमुख तरुण असल्याने पक्षाने त्यांच्याकडून संघटना वाढीच्या मोठया अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हयात शिवसेनेचं म्हणावं तसं संघटन वाढलं नाही. उलट शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी नेहमीच चव्हाटयावर येत होती. राज्यात शिवसेनेची सत्ता असतांना बीडच्या पदाधिकार्‍यांना पक्ष वाढवता आला नाही. सचिन मुळूक यांच्या पदाला शिवसेनेने अचानक स्थगिती देवून यांच्या जागी काही महिन्यापुर्वी अप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. जाधव हे माजलगावचे आहेत. जाधव यांच्याही अनेक तक्रारी पक्षाकडे गेल्या, ते मध्यंतरी वादग्रस्त ठरले होते. खांडे यांच्या तक्रारीचा पाढा नेहमीच वाचला जात असे. गुटखा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. आता पर्यंत जिल्हाप्रमुखांच्या इतक्या चर्चा आणि तक्रारी कधीच गेल्या नव्हत्या. त्या गेल्या दोन वर्षात पक्षाकडे गेल्या. खांडे, मुळूक यांचा जिल्हाप्रमुख पदाचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच त्यांच्या पदावर गंडांतर आलं. दोघांनाही आपलं पद सांभाळता आलं नाही. शिवसेनेचं जिल्हाप्रमुख पद म्हणजे एक मिनी आमदार असल्यासारखचं असतं. पदाची शान वाढून कामे करता येतात, पण ते खांडे, मुळूक यांना जमलं नाही.

जोडी चर्चेत असायची!
यापुर्वीचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे हे होते. या दोघांनी दहा वर्ष जिल्हाप्रमुख पदाचा कारभार हाकला. दहा वर्ष जिल्हाप्रमुख असतांना हे दोघे कधीच वादात सापडले नाहीत. पक्षाशी इमान राखून ते काम करत राहिले. राजकीय क्षेत्रात त्याचं तितकं वजन ही होतं, त्यांच्या कारर्कीदीची आज ही चर्चा होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!